बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर (Saif Ali Khan) १६ जानेवारी रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. या घटनेमुळे अवघ्या कलाविश्वाला आणि त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता. वांद्रे (पश्चिम) येथील त्याच्या घरात घुसून एका दरोडेखोराने त्याच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात अभिनेता गंभीर जखमी झाला होता. दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत सैफच्या मानेला व मणक्याला दुखापत झाली होती. या घटनेनंतर त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते.
जीवघेण्या हल्ल्यानंतर पाच दिवसांनी सैफला २१ जानेवारी रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात अभिनेता घरी पोहोचला. त्यानंतर अभिनेत्याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली. आता दोन महिन्यांनंतर सैफ अली खान या घटनेतून सावरला आहे. तसेच त्याने त्याच्या कामाला सुरुवातही केली आहे. अशातच सैफच्या प्रकृतीबाबत त्याची बहीण व अभिनेत्री सोहा अली खानने (Soha Ali Khan) माहिती दिली आहे. अभिनेत्री तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असताना तिने सैफच्या प्रकृतीबद्दल सांगितले.
सोहा अली खान तिच्या ‘छोरी २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत तिने सैफच्या तब्येतीबद्दल म्हटले, “आम्हा सर्वांना सैफची काळजी वाटत होती. आमची कायम हीच इच्छा होती की, तो बरा व्हावा आणि आता तो पूर्णपणे बरा झाला आहे. तसेच तो त्याच्या कामावरही परतला आहे. आम्हालाही हेच हवे होते. देवाचे आभार, आता तो पूर्णपणे बरा आहे.” दरम्यान, सोहा अली खानच्या ‘छोरी २’ या चित्रपटात तिच्याबरोबर नुसरत भरुचादेखील आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला होता, ज्यामध्ये आरोपी शरीफुल इस्लामला अटक करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी आरोपींनी मुंबई सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता, ज्यावर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी मुंबई पोलिसांनी न्यायालयात आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध केला. पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपी बांगलादेशचा नागरिक आहे. त्याला जामीन मिळाला, तर तो देश सोडून पळून जाण्याची शक्यता आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, शरीफुल त्याच्या पगारातून दरमहा काही पैसे बांगलादेशला पाठवीत असे. यावरून त्याचे नागरिकत्व सिद्ध होते. आरोपी पुन्हा असा गुन्हा करू शकतो, अशी भीती पोलिसांना आहे. या कारणास्तव तपास योग्यरीत्या पूर्ण व्हावा म्हणून त्याला जामीन देऊ नये, अशी मागणी वांद्रे पोलिसांनी न्यायालयाकडे केली आहे.