Saif Ali Khan : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारीच्या मध्यरात्री चाकू हल्ला झाल्याची घटना घडली. यानंतर त्याच्यावर वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते, अभिनेत्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आली. अखेर पाच दिवसांनी अभिनेत्याला मंगळवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला. एवढी मोठी सर्जरी झाल्यावर रुग्णालयातून सैफ एकदम फिट होऊन बाहेर पडल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

प्रकृतीत सुधारणा झाल्यावर सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पांढरा शर्ट आणि जीन्स या लूकमध्ये अभिनेत्याची पहिली झलक सर्वांना पाहायला मिळाली. सैफने घरी परतल्यावर सगळ्या पापाराझींसह चाहत्यांना हातवारे करुन अभिवादन केलं. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता सैफच्या घराचा आणखी एक व्हिडीओ सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

सैफ अली खानच्या घराला आकर्षक रोषणाई

सैफ घरी परतल्यावर त्याच्या घरी दिवाळीच्या सणाप्रमाणे आकर्षक रोषणाई केल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्याच्या स्वागतासाठी त्याच्या कुटुंबीयांनी खास तयारी केली होती. सैफ घरी येताच करीनाची मोठी बहीण अभिनेत्री करीश्मा कपूरने “Positive vibese only” अशा आशयाची इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. तर, सैफची बहीण सबा पतौडीने एक खास पोस्ट शेअर करत जेह आणि तैमूरचा जीव वाचवणाऱ्या दोन मदतनीसांचे आभार मानले आहेत.

“आमच्या घरचे खरे हिरोज. ज्यांनी स्वत:ची पर्वा न करता आमच्या कुटुंबांसाठी खरी जोखीम उचलली. तुम्हा दोघींना खूप प्रेम…माझ्या भावाला आणि त्याच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यात तुमचा मोठा वाटा आहे. तुम्ही आमचे हिरो आहात!” असं सबाने तिच्या पोस्टमध्ये लिहलं आहे.

saba post
सबा पतौडीची पोस्ट

दरम्यान, सैफवर हल्ला झाल्यावर यापूर्वी करीनाने पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. “हा आम्हा कुटुंबीयांसाठी प्रचंड आव्हानात्मक दिवस होता. एक कुटुंब म्हणून या घटनेतून बाहेर पडण्यासाठी आम्हाला काही वेळ द्या. या संवेदनशील काळात तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छिते” असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

Story img Loader