Saif Ali Khan Attack : वांद्रे येथील राहत्या घरात मध्यरात्री झालेल्या चाकूहल्ल्यानंतर बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली आहे. ही बातमी समोर येताच सैफचे सगळे चाहते चिंतेत पडले होते. अखेर अभिनेत्याच्या टीमने तसेच डॉक्टरांनी आता सैफची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे.
सैफवर हल्ला झाल्यावर मध्यरात्रीच त्याचा मोठा मुलगा इब्राहिम अली खानने अभिनेत्याला केअरटेकरच्या मदतीने रुग्णालयात दाखल केलं होतं. यानंतर सैफवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. गुरुवारी सकाळी इब्राहिम, सारा अली खान, सैफची पत्नी अभिनेत्री करीना कपूर या सगळ्यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन सैफची भेट घेतली होती. यानंतर अभिनेता रणबीर कपूर सुद्धा सैफची भेट घेण्यासाठी लीलावतीत पोहोचला होता. यावेळी सैफचे कुटुंबीय सुद्धा रुग्णालयात उपस्थित होते. यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याची ओळख पटली, पोलिसांची माहिती; चोरटा घरात नेमका कसा शिरला? जाणून घ्या
सैफची धाकटी बहीण सोहा अली खान तिचा पती कुणाल खेमूसह रुग्णालयात भावाला भेटण्यासाठी पोहोचली होती. यावेळी भावाची भेट घेऊन बाहेर पडल्यावर सोहाचे डोळे पाणावल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय अन्य बॉलीवूड सेलिब्रिट देखील करीना व तिच्या मुलांची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी पोहोचले आहेत.
रणबीर कपूर व आलिया भट्ट, मलायका अरोरा, अमृता अरोरा, संजय दत्त, करण जोहर या सगळ्या सेलिब्रिटींनी करीना व तिच्या दोन्ही मुलांची नुकतीच भेट घेतली आहे. याचे व्हिडीओ ‘फिल्मीग्यान’ या पापाराझी पेजवरून शेअर करण्यात आले आहेत.
दरम्यान, सैफ अली खानवर शस्त्रक्रिया पार पडली असून, सध्या अभिनेत्याच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत अशी माहिती लीलावती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
© IE Online Media Services (P) Ltd