बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान नुकताच एका मोठ्या संकटातून बाहेर पडला आहे. १६ जानेवारीला सैफच्या वांद्रे येथील राहत्या घरात घुसून एका चोराने त्याच्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या सैफला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी आपल्या मुलाबद्दल ही माहिती मिळताच सैफच्या आई आणि बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर यांनीही रुग्णालयात धाव घेतली होती. आता सैफने त्याच्या एका मुलाखतीमध्ये रुग्णालयातील आईबरोबरच्या काही आठवणी सांगितल्या आहेत.
सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा आई शर्मिला टागोर या मुंबईत नव्हत्या. त्या दिल्लीला होत्या. मुलाबद्दल अशी माहिती मिळताच त्यांनी दिल्लीहून मुंबईला धाव घेतली. नुकतीच सैफ अली खानने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्याने त्याला रुग्णालयात बालपणाची आठवण आल्याचं सांगितलं आहे. तसेच आई शर्मिला यांनी त्याची कशी काळजी घेतली याबद्दल सांगितलं आहे. शर्मिला टागोर सैफ रुग्णालयात असताना सतत त्याला इतर कोणताही आजार होणार नाही, यासाठी डॉक्टरांवर कडक लक्ष ठेवायच्या.
सैफने सांगितलं, “डॉक्टरांसह अन्य स्टाफने तोंडाला मास्क लावला आहे की नाही, याकडे तिचं नेहमी लक्ष असायचं, त्यामुळे मला आई जवळ असल्याने बरं होण्यासाठी खूप मदत झाली. ती सतत मला धीर देत होती. एकदा तिने माझा हात पकडला आणि मला गाणं गाऊन दाखवलं. ते गाणं म्हणजे एक अंगाई होती. आईने गायलेली अंगाई ऐकून मन भरून आलं. मी लहान होतो, त्यानंतर हे असं कधीच झालं नव्हतं.”
तैमूरला रुग्णालयात आणल्याच्या निर्णयाचं आईकडून समर्थन
सैफ अली खानवर हल्ला झाला त्या रात्री त्याचा मुलगा इब्राहिम त्याला रुग्णालयात घेऊन आल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र, इब्राहिम नाही तर तैमूर सैफसह रुग्णालयात गेला होता. त्याच्या या निर्णयाने आई शर्मिला टागोर त्याच्यावर ओरडतील असं त्याला वाटलं होतं. मात्र, त्यांनी सैफच्या या निर्णयाचंही समर्थन केलं. सैफ म्हणाला, “आईने मला सांगितलं, नाही, तू जो विचार केलास तो अगदी योग्य होता; तू त्याला आधीपासून अनेक गोष्टी शिकवल्या आहेत, तो एक वेगळा मुलगा आहे.”
सैफने तैमूरला बरोबर का नेलं होतं?
सैफने मुलाखतीमध्ये तैमूरला बरोबर आणण्याचं कारणही सांगितलं. तो म्हणाला, “त्या रात्री करीना प्रचंड घाबरली होती. तिने माझ्यासाठी रिक्षा पाहिली. रिक्षामध्ये मला बसवलं, त्यावेळी तैमूरसुद्धा तेथे होता. मी जात असताना त्याने मला “मी तुझ्याबरोबर येऊ का?” असं विचारलं. त्यावेळी करीनानेही त्याला बरोबर घेऊन जाण्याची परवानगी दिली. कारण काही झालंच तर त्याच्या चेहऱ्याकडे पाहून मला लढण्याची ताकद मिळेल असं मला वाटलं. त्याला बरोबर घेऊन जाणे कदाचित चुकीचं होतं, मात्र त्यावेळी मला तेच योग्य वाटलं.”