Saif Ali Khan अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी हल्ला करण्यात आला. त्याच्या घरात चोर चोरी करण्याच्या उद्देशाने आला होता. त्याची चाहूल घरातील गृहसेविकाला लागली तिने त्याला अडवलं, मात्र काही उपयोग झाला नाही. त्यानंतर ती ओरडली. सगळी गडबड ऐकून सैफ अली खान धावत त्याच्या खोलीबाहेर आला. यावेळी झालेल्या झटापटीत हल्लेखोराने सैफवर सहा वार केले. सैफ चांगलाच जखमी झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता सैफची प्रकृती व्यवस्थित आहे. सैफवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरालाही अटक झाली आहे. सैफवर त्याने हल्ला केल्यानंतर जेव्हा पळ काढला त्यावेळी काय केलं तो घटनाक्रमही समोर आला आहे.
तीस वर्षांच्या मोहम्मदला पोलिसांनी केली अटक
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. हा तीस वर्षांचा असून मूळचा बांगलादेशी आहे. सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर तो पळाला होता त्यानंतर ७० तासांमध्ये त्याला अटक करण्यात आली आहे. मोहम्मद हा विजय दास, बिजॉय दास अशी नावं बदलून मुंबईत राहात होता. मागच्या सहा महिन्यांपासून तो मुंबईत आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीच्या उद्देशाने तो सैफ अली खानच्या घरात शिरला होता. मोठं घर आहे हे पाहूनच त्याने चोरी करायचं ठरवलं ते सैफ अली खानचं घर आहे याची त्याला माहिती नव्हती असंही पोलिसांनी सांगितलं.
मोहम्मद बांगलादेशातून आला मुंबईत
मोहम्मद बांगला देशातून बेकायदेशीररित्या भारतात आला, त्यानंतर मुंबईत पोहचला. ठाण्यातल्या एका बारमध्ये त्याने काम केलं. त्यानंतर तो एका हाऊसकिपिंग एजन्सीमध्येही काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मदकडे तो भारतीय असल्याचे कुठलेही पुरावे नाहीत. सैफशी झटापट झाल्यावर मोहम्मद पळाला. त्यानंतरचा घटना क्रम काय घडला तेदेखील समोर आलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.
हे पण वाचा- सैफ अली खानच्या उपचारांसाठी किती खर्च झाला? मेडिक्लेमचा आकडा आला समोर, डिस्चार्जची तारीखही झाली उघड
मोहम्मद सैफच्या घरातून पळाल्यावर काय झालं?
मोहम्मद सैफच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने शिरला होता. मात्र आधी त्याच्या घरातील गृहसेविकाला तो आल्याचं कळलं. त्यानंतर ती जेव्हा ओरडली तेव्हा सैफ धावून आला. सैफ आणि त्याची झटापट झाली. यामध्ये त्याने सैफवर चाकूचे सहा वार केले. यानंतर मोहम्मद तिथून पळाला. तो वांद्रे येथे स्टेशनला गेला आणि दादरला पोहचला. दादरहून तो वरळीला त्याने तात्पुरती व्यवस्था केलेल्या घरात पोहचला. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं तोपर्यंत त्याने पाहिलं होतं. त्यामुळे त्याने आहे ती जागा सोडून पळ काढायचा आणि लपून बसायचं असं ठरवलं. त्यानंतर तो ठाण्यातल्या कासारवडवली या ठिकाणी पोहचला. कांदळवनाच्या जवळ असलेल्या मजुरांच्या कँपमध्ये तो जाऊन राहू लागला. आपण कुठल्याही सीसीटीव्हीच्या किंवा कॅमेराच्या नजरेत येणार नाही याची त्याने तीन दिवस काळजी घेतली. पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे हे काही शांत बसले नव्हते. त्यांनी या मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला शोधण्यासाठी २० पथकं तयार केली होती. मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादने हे मान्य केलं आहे तो हल्ला करुन पळाला तेव्हा त्याने फारसं कुणाशी बोलायचं नाही, कुणाबरोबर जास्त मिसळायचं नाही हे केलं.
मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादचा शोध नेमका कसा लागला?
मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा तीन दिवस पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी झाला. एका मोबाइल शॉपच्या सीसीटीव्ही कॅमेरात मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादचा चेहरा कैद झाला. त्यानंतर त्याने एका ठिकाणी युपीआय पेमेंट केलं. गुगल पेचा वापर करुन त्याने मोबाइलसाठी कव्हर घेतलं. त्यामुळे त्याचा डिजिटल व्यवहार हा त्याच्यापर्यंत पोहचण्याचा महत्त्वाचा धागा झाला. डिजिटल पेमेंट केल्यामुळे त्याच्या मोबाइलचं लोकेशन पोलिसांना कळलं. त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी गेले. त्याच्या आधीच्या मालकाकडून तसंच मजूरांच्या कंत्राटदाराकडून त्याच्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्याचं लोकेशन कुठे आहे हेदेखील समजलं आणि मग त्याला अटक करण्यात आली. त्याचा कुठलाही गुन्हेगारी रेकॉर्ड यापूर्वी नाही अशी माहितीही पोलिसांनी दिली.