बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) काही दिवसांपासून कोणत्या चित्रपटामुळे नाही, तर त्याच्यावर जो हल्ला झाला होता, त्यामुळे मोठ्या चर्चेत आहे. १६ जानेवारीला एका चोराकडून हा हल्ला केला गेला होता. सैफ अली खानच्या घरात चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या व्यक्तीने हा हल्ला केला होता. हा हल्ला जेव्हा झाला, त्यावेळी घरात सैफ अली खानशिवाय त्याची दोन मुले आणि करीना कपूरदेखील होती. आता सैफ अली खानने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या हल्ल्याविषयी वक्तव्य केले आहे.
मला कोणापासून तरी धोका…
सैफ अली खानने हल्ला झाल्यापासून पहिल्यांदाच ‘दिल्ली टाइम्स’ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याच्यावर झालेल्या हल्ल्याविषयी तो बोलला, “माझ्या मुंबईतील घरात अतिरिक्त सुरक्षेसाठी मी कोणतेही शस्त्र ठेवत नाही. कारण- मला कोणापासून तरी धोका आहे, असे मला वाटत नाही. हा ठरवून किंवा पूर्वनियोजित असा हल्ला नव्हता. मला असे वाटते की हा जो चोरी वा दरोड्याचा प्रयत्न होता तो फसला. त्या बिचाऱ्या व्यक्तीचे आयुष्य माझ्यापेक्षा वाईट झाले आहे.”
तो त्या खोलीत पुन्हा हल्लेखोराबरोबर असता, तर त्या परिस्थितीत त्याने काही वेगळे केले असते का? यावर बोलताना सैफ अली खानने म्हटले की, सगळ्यात पहिल्यांदा मी लाइट लावली असती आणि त्याला विचारले असते की, तुला माहीत आहे का? मी कोण आहे? त्यावर त्याने म्हटले असते की. अरे बापरे! मी चुकीच्या घरात घुसलो आहे. मग मी म्हटले असते की, बरोबर, आता चाकू खाली ठेव. आपण यावर बोलू. मला वाटते की, मी तर्कसुसंगत पद्धतीने विचार केला असता. पण, जेव्हा ती घटना घडली तेव्हा तो राग, संताप, स्वत:ला वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न हे सगळे एकत्र होते. तेव्हा जे काही घडले, ते खूप पटकन व सहज घडले.
सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर तो लीलावती रुग्णालयात दाखल झाला होता. तो या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर सहा शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. उपचारानंतर पाच दिवसांनी तो घरी परतला. या घटनेनंतर देशभरातून प्रतिक्रिया आल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, पोलिसांनी सैफवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. सैफ अली खानवर हल्ला करणारी व्यक्ती बांगलादेशी नागरिक आहे. त्याचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम ऊर्फ विजय दास, असे आहे. याआधी त्याने कोलकातामधील रहिवासी असल्याचे म्हटले होते.