Saif Ali Khan on Knife Attack: अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी २०२५ च्या मध्यरात्री वांद्रे येथील घरात हल्ला झाला. चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या हल्लेखोरापासून मुलांना वाचवताना सैफ गंभीर जखमी झाला होता. आता सैफ पहिल्यांदाच या घटनेबद्दल व्यक्त झाला आहे. रक्तबंबाळ सैफबरोबर करीना कपूरऐवजी ८ वर्षांचा तैमूर रुग्णालयात का गेला होता, याचा खुलासाही स्वतः अभिनेत्याने केला आहे.
सैफ अली खानने बॉम्बे टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल प्रतिक्रिया दिली. सैफने त्याचा कुर्ता कसा रक्तस्त्राव होऊन लाल झाला होता, तेही सांगितलं. तैमूर, धाकटा मुलगा जेह आणि पत्नी करीना त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी ऑटो किंवा कॅब शोधत खाली उतरले होते, असंही सैफने नमूद केलं.
ती सर्वांना फोन करत होती – सैफ अली खान
“मी म्हणालो, मला थोडं दुखतंय. माझ्या पाठीत काहीतरी झालंय. करीना म्हणाली, ‘तू रुग्णालयात जा आणि मी माझ्या बहिणीच्या घरी जाईन.’ ती सर्वांना फोन करत होती, पण कोणीही फोन उचलले नाही. मग आम्ही एकमेकांकडे पाहिलं आणि मी तिला म्हणालो, ‘मी ठीक आहे, मी मरणार नाही.’ आणि तैमूरने मला विचारलं, मी मरणार आहे का? मी त्याला नकार दिला,” असं सैफने सांगितलं.
तैमूर रुग्णालयात सोबत आला, त्याबद्दल सैफ म्हणाला…
आठ वर्षांचा तैमूर त्याच्याबरोबर रुग्णालयात का आला, याबद्दल सैफने माहिती दिली. “तो एकदम शांत होता. तो ठीक होता. तो म्हणाला, ‘मी तुझ्याबरोबर येतोय.’ आणि मला वाटलं काही झालं तर.. पण त्यावेळी त्याच्याकडे पाहून मला दिलासा मिळत होता आणि मला रुग्णालयात एकटं जायचं नव्हतं,” असं सैफ म्हणाला.
सैफ पुढे म्हणाला, “माझ्या पत्नीने त्याला माझ्याबरोबर पाठवलं. कदाचित त्यावेळी तेच आम्हाला योग्य वाटलं. पण तो माझ्याबरोबर आला, याचा मला आनंद झाला. मला एकवेळ वाटलं की जर मला काही झालं तर तैमूरने माझ्याबरोबर असावं आणि त्यालाही माझ्यासोबत यायचं होतं. त्यामुळे तो मी आणि हरी रिक्षाने रुग्णालयात गेलो.”
सैफच्या पाठीत चाकूचे टोक घुसले होते, त्यामुळे त्याच्यावर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. ५ दिवस उपचार झाल्यानंतर सैफला डिस्चार्ज देण्यात आला होता. सध्या त्याची प्रकृती बरी आहे. तो लवकरच ज्वेल थिफमध्ये दिसणार आहे.