बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे येथील घरी चोरीच्या उद्देशाने आलेल्या हल्लेखोराने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार झाले. पाच दिवसांनी मंगळवारी त्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. या हल्ल्यानंतर एका आठवड्याने मुंबई पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा सैफचा जबाब नोंदवला.
सैफ अली खानने त्याच्या घरी घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली, असे वृत्त न्यूज १८ ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. जेह खोलीत रडत होता, असं सैफने पोलिसांना सांगितलं. सैफ अली खान पोलिसांना म्हणाला की १६ जानेवारीला मध्यरात्री २.३० ते २.४० वाजताच्या दरम्यान त्याने त्याच्या घरात गोंधळ ऐकला. त्यावेळी तो पत्नी करीना कपूरबरोबर इमारतीच्या १२व्या मजल्यावर त्याच्या खोलीत होता. “आवाज ऐकून मी ११ व्या मजल्यावर खाली आलो, तिथे माझी दोन्ही मुलं आणि त्यांचे केअरटेकर राहतात. मी जेहच्या खोलीत पोहोचलो तेव्हा मला त्याची केअरटेकर एका अनोळखी व्यक्तीशी मोठ्या आवाजात बोलताना दिसली. त्या माणसाकडे चाकू होता. त्याच्याकडून धोका आहे, हे लक्षात येताच मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला,” असं सैफ म्हणाला.
सैफ अली खानने पोलिसांना सांगितलं की त्याने हल्लेखोराला घट्ट पकडलं होतं. मात्र, त्याने त्याच्यावर एकापेक्षा जास्त वेळा चाकूने वार केले. “मी हल्लेखोराला घट्ट पकडलं होतं, पण त्याने माझ्या पाठीत, हातावर वारंवार वार केल्यानंतर तो माझ्या हातातून निसटला. हे सगळं पाहून माझे कुटुंबीय आणि घरात काम करणारे कर्मचारी घाबरले,” असं सैफने पोलिसांना सांगितलं.
जखमी झाल्यावर सैफने आरोपीला खोलीत ढकललं आणि मग नॅनी जेहला घेऊन तिथून गेल्या आणि मग सैफने आरोपीला खोलीत बंद केलं सैफ अली खानवर हल्ला झाला तेव्हा त्याची पत्नी करीना कपूर खान घरात होती. “मला जखमी अवस्थेत पाहून व रक्तस्त्राव पाहून करीना आणि माझी मुलं घाबरली. त्यानंतर मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं,” असं सैफ अली खानने पोलिसांना सांगितले.
सैफ अली खानवर १६ जानेवारीच्या मध्यरात्री त्याच्या वांद्रे येथील घरात हल्लेखोराने हल्ला केला. हल्ला करणारा आरोपी हा बांगलादेशी आहे. घटनेनंतर तीन दिवसांनी पोलिसांनी ठाण्यातून शरीफुल इस्लाम शेहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर (३०) उर्फ विजय दास याला अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.