Saif Ali Khan Attack: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात १६ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्री चोर घुसला होता. या चोरट्याने चाकू हल्ला केल्याने अभिनेत्याला सहा जखमी झाल्या होत्या. हल्ल्यानंतर अभिनेत्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता एका मुलाखतीत सैफने सांगितलं की हल्ल्यानंतर तो रिक्षाने हॉस्पिटलमध्ये का गेला होता.
सैफ अली खान कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. त्याच्याकडे व त्याची पत्नी करीनाकडे अनेक लक्झरी गाड्या आहेत. मात्र हल्ला झाला, त्या रात्री तो रक्तबंबाळ अवस्थेत रिक्षाने लीलावती रुग्णालयात गेला होता. त्यावेळी त्याच्याबरोबर ८ वर्षांचा लेक तैमूर व एक कर्मचारी होता. घरी गाड्या, ड्रायव्हर असूनही सैफला रिक्षाने रुग्णालयात का जावं लागलं, याबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या जात होत्या. अखेर सैफनेच त्यामागचं कारण सांगितलं आहे.
रिक्षाने रुग्णालयात का गैला सैफ?
सैफ अली खान हल्ला झाल्यावर घरी ड्रायव्हर नसल्यामुळे रिक्षाने लीलावती रुग्णालयात गेला होता. दिल्ली टाइम्सशी बोलताना सैफ म्हणाला, “रात्रभर आमच्या घरी कोणताही ड्रायव्हर थांबत नाही, सर्वांना घरी जायचं असतं. काही जण घरी असतात, पण ड्रायव्हर रात्री नसतो. जर आम्ही रात्री बाहेर जाणार असू किंवा काही महत्त्वाचे काम असेल तरच त्यांना थांबायला सांगतो. हल्ला झाल्यानंतर मला चावी सापडली असती तर मीच गाडी चालवून रुग्णालयात गेलो असतो, पण मला चावी सापडली नाही. माझ्या पाठीला त्रास होत होता, पण मी पूर्ण शुद्धीत होतो. तसेच ड्रायव्हरला पोहोचायला वेळ लागला असता, म्हणून मी रिक्षाने रुग्णालयात गेलो.”
सैफ अली खान हल्ल्यानंतर ५ दिवस रुग्णालयात राहिला होता. त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली, तरीही तो इतक्या लवकर बरा झाल्याने लोक बऱ्याच गोष्टी बोलत आहेत. अनेकांनी इतकी दुखापत होऊन तो लवकर बरा कसा झाला, याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे. त्याबाबत सैफने प्रतिक्रिया दिली. “मला वाटतं की लोक अशा प्रसंगांमध्ये काहीतरी प्रतिक्रिया देणारच. काही लोक त्याची खिल्ली उडवतील. काही लोकांचा यावर विश्वास बसणार नाही, त्यामुळे खिल्ली उडवतील. मला वाटते की हे ठीक आहे. असं काही घडल्यावर लोकांची सहानुभूती मिळाली असती, तर ते सगळं निरस वाटलं असतं. मला हेच अपेक्षित असल्याने त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज वाटत नाही,” असं सैफ म्हणाला.