Saif Ali Khan Sister Saba Ali Khan Pataudi : सैफ अली खानवर दरोडेखोरांनी चाकूने हल्ला केल्याची घटना गुरुवारी ( १६ जानेवारी ) मध्यरात्री घडली. यानंतर अभिनेत्याला पहाटे तीन वाजता त्याचा लेक इब्राहिमने तातडीने रुग्णालयात दाखल केलं. सैफवर हल्ला झाल्याची बातमी समोर येताच त्याचे लाखो चाहते चिंतेत पडले होते. अखेर अभिनेत्याची बहीण सबा अली खान पतौडीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत, सैफवर शस्त्रक्रिया पार पडली असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती दिली.
“सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली असून त्याच्या जीवाला आता कोणताही धोका नाहीये. सध्या त्याच्यावर पुढील उपचार सुरू असून डॉक्टर त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. कुटुंबातले सगळे सदस्य पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.” असं सबाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आता सबाने शेअर केलेली आणखी एक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.
सैफची प्रकृती स्थिर झाल्यावर सबाने आपल्या भावाबरोबरचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये सबा लिहिते, “या घटनेनंतर आम्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. पण, भाईजान आम्हाला सर्वांनाच तुझा खूप अभिमान आहे. आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी तू खंबीरपणे उभा राहिलास…अब्बांना सुद्धा तुझा गर्व वाटेल. लवकर बरा हो…मी तिथे नाहीये पण, आपली लवकरच भेट होईल. तुझ्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करते… आय लव्ह यू”
दरम्यान, सैफ अली खानवर शस्त्रक्रिया पार पडल्यावर रुग्णालयात जाऊन सारा अली खान, इब्राहिम, करीना कपूर खान, करीश्मा कपूर, रणबीर कपूर या सगळ्यांनी अभिनेत्याची भेट घेतल्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, मध्यरात्री लीलावती रुग्णालयात डॉ. नितीन डांगे यांच्या नेतृत्वाखाली कॉस्मेटिक सर्जन डॉ. लीला जैन आणि भूलतज्ज्ञ डॉ. निशा गांधी यांच्या टीमने सैफवर उपचार करण्यास सुरुवात केली होती. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून अभिनेता आता ‘आऊट ऑफ डेंजर’ असल्याची माहिती डॉक्टरांनी माध्यमांना दिली आहे.