काही दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरात घुसून चाकूने हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यानंतर त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. झालेल्या हल्ल्यात सैफच्या शरीरात चाकूचं एक टोक घुसलं होतं. शस्त्रक्रिया करून ते बाहेर काढण्यात आलं होतं. मात्र, सैफचा हा पब्लिसिटी स्टंट होता असा दावा काहींनी केला होता. अशात आता सैफच्या मानेवरील जखमांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करीना कपूर फॅन क्लब या एक्स अकाउंटवर हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. तसेच यावर पब्लिसिटी स्टंटचा दावा करणाऱ्यांना उत्तरही देण्यात आलं आहे. “ज्या व्यक्तींनी गेल्या काही दिवसांपासून करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्यावर प्रश्न उपस्थित केले त्यांच्यासाठी हे फोटो. मानेवर बरे होत असलेल्या जखमा दिसत आहेत. स्वत:ला झालेली दुखापत दाखवण्याऐवजी सैफने मोठी कॉलर असलेला शर्ट घातला आहे.”

दरम्यान, सैफ अली खान झालेल्या घटनेनंतर काल पहिल्यांदाच एका कार्यक्रमात उपस्थित राहिला. या घटनेतून बाहेर पडत त्याने पुन्हा आपल्या कामाला सुरूवात केली आहे. सोमवारी सैफ अली खान नेटफ्लिक्स ओटीटी रिलीज, ‘ज्वेल थेफ्ट – द रेड सन चॅप्टर’ टीझर लॉन्च इव्हेंटला उपस्थित होता. यावेळी त्याने चित्रपटाविषयी माहिती देत सहकलाकारांचे कौतुक केले. “इथे सर्वांसमोर उभं राहून फार छान वाटत आहे. तसेच येथे येऊन मला फार आनंद झाला.”, असं सैफ अली खान मंचावर आल्यावर म्हणाला.

चित्रपटाविषयी बोलताना तो पुढे म्हणाला की “मला नेहमीच चोरीवर आधारीत चित्रपट करायचा होता आणि अशा चित्रपटासाठी मी यापेक्षा चांगल्या सहकलाकारांची मागणी करू शकत नाही. मुळात हा एक सुंदर चित्रपट आहे आणि मी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे.”

सैफ असी खान या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर काही नेटकऱ्यांनी त्याच्यावर पुन्हा प्रश्न उपस्थित केले. एका एक्स अकाउंटवर सैफचा व्हिडीओ पोस्ट करत “सैफ अली खान त्याच्या पुढील नेटफ्लिक्स ओटीटी रिलीज, ज्वेल थीफच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात उपस्थित होता. चाकू हल्ल्याची घटना ही फक्त चित्रपटाच्या पब्लिसिटीचा एक स्टंट होती.” असं कॅप्शन लिहिलं आहे.

सैफच्या ‘ज्वेल थेफ्ट – द रेड सन चॅप्टर’ चित्रपटाविषयी

‘ज्वेल थेफ्ट – द रेड सन चॅप्टर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन कुकी गुलाटी आणि रॉबी ग्रेवाल यांनी केले आहे. तर सिद्धार्थ आनंदने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. याआधी सैफ अली खानने सिद्धार्थ आनंद निर्मित ‘ता रा रम पम’ आणि ‘सलाम नमस्ते’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सैफबरोबर यामध्ये जयदीप अहलावत, कुणाल कपूर आणि निकिता दत्ता यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली आहे.