सैफ अली खानवर चाकूहल्ला झाल्याची बातमी समोर येताच मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे. घरात शिरलेल्या दरोडेखोराने सैफवर वार केल्याची घटना गुरुवारी (१६ जानेवारी ) मध्यरात्री घडली. पहाटे ३.०० च्या सुमारास सैफला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इब्राहिम अली खान आणि सैफच्या केअरटेकरने अभिनेत्याला रुग्णालयात दाखल केलं होतं. दरोडेखोराने अभिनेत्यावर तब्बल ६ वार केले. यापैकी २ वार जास्त खोल होते. यामुळे अभिनेत्याच्या शरीरातून बरंच रक्त सुद्धा वाहून गेलं होतं. यावेळी अभिनेत्याच्या उपचारासाठी मध्यरात्री उभी राहिली डॉ. नितीन डांगे व त्यांची टीम. यानंतर सैफवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सैफवर उपचार करणारे मराठमोळे डॉ. नितीन डांगे कोण आहेत जाणून घेऊयात…
घरात शिरलेल्या चोराने सैफवर एकूण सहा वार केले होते. यातले दोन वार खूपच खोलवर गेले होते. यामुळे अभिनेत्याला झटपट उपचार मिळणं गरजेचं होतं. मध्यरात्री लीलावती रुग्णालयात डॉ. नितीन डांगे यांच्या नेतृत्वाखाली कॉस्मेटिक सर्जन डॉ. लीला जैन आणि भूलतज्ज्ञ डॉ. निशा गांधी यांच्या टीमने सैफवर उपचार करण्यास सुरुवात केली. ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली असून अभिनेता आता ‘आऊट ऑफ डेंजर’ असल्याची माहिती डॉक्टरांनी माध्यमांना दिली आहे.
डॉ. नितीन डांगे कोण आहेत?
लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या वेबसाइटनुसार, डॉ. नितीन डांगे हे जगप्रसिद्ध कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रोक अँड एंडोव्हस्कुलर न्यूरोसर्जन आहेत. त्यांनी २५ वर्षांहून अधिक काळ काम केलेलं आहे. त्यांची गणना सर्वात वरिष्ठ, हायब्रिड न्यूरोसर्जन आणि स्ट्रोक तज्ज्ञांमध्ये केली जाते. एमबीबीएस पूर्ण केल्यावर डॉक्टरांनी अनेक पदव्या व सन्मान मिळवले आहेत. एमएस, एमसीएच, ओबीएनआय (यूएसए), एफएफएचयू (जपान). एंडोव्हस्कुलर (इंटरव्हेंशनल न्यूरोसर्जरी), कॉम्प्रिहेन्सिव्ह न्यूरोसर्जरी, एन्युरिझम्स न्यूरोसर्जरी म्हणजेच कॉइलिंग आणि क्लिपिंग, आर्टेरिओव्हेबस मॅलफॉर्मेशन (एव्हीएम) म्हणजेच एम्बोलायझेशन आणि सर्जरी यामध्ये त्यांचा सखोल अभ्यास आहे.
सैफच्या प्रकृतीवर पुढील काही दिवस डॉक्टरांची संपूर्ण टीम लक्ष ठेवून असणार आहे. सध्या त्याच्यावर डॉ. नितीन डांगे- कन्सल्टंट न्यूरोसर्जन, डॉ. लीना जैन- कन्सल्टंट प्लास्टिक सर्जन, डॉ. निशा गांधी- कन्सल्टंट अॅनेस्थेसियोलॉजिस्ट, डॉ. कविता श्रीनिवास- इंटेन्सिव्हिस्ट, डॉ. मनोज देशमुख-कन्सल्टंट रेडिओलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्यानंतर मुंबई पोलिसांनी सध्या त्याच्या घरात काम करणाऱ्या तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. या तिघांचीही चौकशी सुरू आहे. सारा अली खान, इब्राहिम, रणबीर कपूर, सैफच्या बहिणी, करीना कपूर या सगळ्यांनी लीलावती रुग्णालयात अभिनेत्याची भेट घेतली आहे.