Saiyami Kher completes Ironman race Triathlon : सैयामी खेर (Saiyami Kher) हिने २०१६ मध्ये ‘मिर्झिया’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अलीकडेच ती अभिषेक बच्चनबरोबर ‘घूमर’ या चित्रपटात दिसली होती. यात तिने हात गमावलेल्या क्रिकेटपटूची भूमिका साकारली होती. आता सैयामी तिच्या चित्रपटामुळे नाही तर तिने केलेल्या कामगिरीमुळे चर्चेत आहे. सैयामीने जर्मनीत आयर्नमॅन ७०.३ ट्रायथलॉन पूर्ण करून मोठे यश मिळवले आहे. ही खडतर शर्यत पूर्ण करणारी सैयामी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. आयर्नमॅन ७०.३ मध्ये १.९ किलोमीटर पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग आणि २१.१ किलोमीटर धावणे यांचा समावेश असतो.
आयर्नमॅन ७०.३ शर्यतीला हाफ आयर्नमॅन देखील म्हटलं जातं, ही जगातील सर्वात कठीण शर्यतींपैकी एक आहे. या स्पर्धेत स्पर्धकांच्या सहनशक्तीचा कस लागतो. या अत्यंत आव्हानात्मक शर्यतीत सैयामीने यशस्वीरीत्या अंतिम रेषा पार केली.
हेही वाचा…“मी मनापासून प्रेम केलं,” विवेक ओबेरॉयचं वक्तव्य; म्हणाला, “माझ्या लग्नात एक्स गर्लफ्रेंड्स…”
आपल्या या प्रवासाविषयी सैयामी खेर म्हणाली, “आयर्नमॅन ७०.३ पूर्ण करून पदक मिळवणे हे माझ्या आयुष्यातील सर्वात अभिमानास्पद क्षणांपैकी एक आहे. हे माझ्या बकेट लिस्टमध्ये खूप आधीपासून होते आणि शेवटी ते पूर्ण केल्याने मला खूप आनंद झाला आहे. १२ ते १४ तासांच्या शूटिंगच्या वेळापत्रकात आयर्नमॅनसाठी प्रशिक्षण घेणे खूप अवघड होते. अनेक दिवस असे होते की मला प्रेरणा मिळत नव्हती, मी माझ्या स्वत:शीच लढत असलेलं हे युद्ध आहे असं मला वाटत होतं.”
“तुम्ही जर मनात एखादी गोष्ट करायची ठरवली, तर कोणतीही गोष्ट तुम्हाला थांबवू शकत नाही. हे मला या शर्यतीने शिकवलं,” असंही सैयामी म्हणाली.
अनुराग कश्यपने केले सैयामीचे कौतुक
अनुराग कश्यपने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर बातमीचा फोटो पोस्ट करत सैयामीच्या या यशाबद्दल कौतुक केले आहे. अनुरागने लिहिले, “सैयामी, तुझे अनेक वर्षांपासून पाहिलेले स्वप्न तुझ्या परिश्रमाने आणि दृढनिश्चयाने साकार झाले आहे.”
हेही वाचा…दिवंगत श्रीदेवींना ‘या’ लोकप्रिय गायकासह करायचा होता चित्रपट, हिंदी शिकवण्याची ऑफरही दिलेली पण…
सैयामी अलीकडेच ‘घूमर’ या चित्रपटात अभिषेक बच्चन आणि अंगद बेदीबरोबर दिसली होती. तसेच ती ‘शर्माजी की बेटी’ या चित्रपटात साक्षी तन्वर, दिव्या दत्ता यांच्यासह प्रमुख भूमिकेत झळकली होती.