५० आणि ६० च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री उषा किरण यांची नात संयमी खेर हीदेखील बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नुकतीच संयमी अभिषेक बच्चनबरोबर ‘घुमर’ या चित्रपटात झळकली. संयमीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात लोकप्रिय दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘मिर्ज्या’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात संयमीसह अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
हा चित्रपट काही फारसा बॉक्स ऑफिसवर चालला नाही, पण या चित्रपटाने दोघांनाही इतर चित्रपट मिळवून देण्यात मदत केली. संयमीने या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती तसेच ती यासाठी भरपूर मेहनतही घेत होती. पण चक्क सचिन तेंडुलकरसाठी संयमी तिच्या आयुष्यातील पहिला चित्रपटही सोडायला तयार होती. नुकतंच तिने ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याचा खुलासा केला आहे.
संयमीची पहिली आवड ही खेळ आहे आणि हे तिने बऱ्याच ठिकाणी सांगितलं आहे. बहुतेक सगळ्याच खेळात संयमीला रुची आहे पण एका सर्वसामान्य भारतीयाप्रमाणेच संयमी ही कट्टर सचिन तेंडुलकरची फॅन आहे, अन् या सचिनसाठी संयमी हातचा बिग बजेट चित्रपटही सोडायला तयार होती.
याविषयी बोलताना संयमी म्हणाली, ” वेस्ट इंडिजविरुद्ध सचिनचा जो शेवटचा कसोटी सामना होता त्यादरम्यान माझ्या मिर्ज्यासाठीच्या ऑडिशन आणि तयारी सुरू होती. मी प्रथमच राकेश मेहरासारख्या दिग्गज व्यक्तीबरोबर काम करत असल्याने एक आदरयुक्त भीती मनात होती. त्यांनी त्यावेळी मला १० नोव्हेंबरला दिल्लीला एका वर्कशॉपसाठी जायला सांगितलं.”
आणखी वाचा : “शाहरुखने जे केलंय ते आम्ही दिग्दर्शक…” ‘जवान’बद्दल भरभरून बोलले विशाल भारद्वाज
पुढे ती म्हणाली, “मी त्यांना अत्यंत साधेपणाने सांगितलं की मला ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट, तुमचं काम मला प्रचंड आवडतं. आपण जो आत्ता चित्रपट करतोय तोसुद्धा मला करायचा आहे पण मी १० नोव्हेंबरला दिल्लीला जाऊ शकत नाही. १४ ते १८ नोव्हेंबर सचिन तेंडुलकरची शेवटची मॅच आहे त्यामुळे मी जाऊ शकत नाही. हा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. यावर राकेश मेहरा हसले कारण त्यांना माहिती होतं की मी सचिनची खूप मोठी फॅन आहे आणि ते याबाबतीत फारसे गंभीर नव्हते.” नंतर खुद्द सचिननेही ‘मिर्ज्या’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली व संयमीची कौतुकही केलं.