‘लय भारी’ हा सिनेमा २०१४ साली प्रदर्शित झाला आणि मराठी प्रेक्षकांनी या सिनेमाला डोक्यावर घेतलं. “आपला हात भारी, आपली लाथ भारी… सगळं लय भारी…” म्हणत रितेश देशमुखने मराठी सिनेमात पदार्पण केलं. सिनेमातील अजय-अतुल यांचं ‘माऊली माऊली’ हे गाणं, रितेशने कपड्यात वीट घेऊन केलेली फायटिंग, हे सगळं आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. हा सिनेमा तेव्हा ब्लॉकबस्टर ठरला. ४१ कोटींची कमाई करणाऱ्या या सिनेमाचं दिग्दर्शन दिवंगत निशिकांत कामत यांनी केलं होतं. या सिनेमाची कथा प्रेक्षकांना खूपच आवडली होती. या सिनेमाच्या निर्मितीत बऱ्यापैकी मराठी नावे असली तरी त्याची कथा बॉलीवूडच्या प्रसिद्ध निर्मात्याने लिहिली होती. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये हे ऐकून स्वतः आमिर खानसुद्धा आश्चर्यचकित झाला.

आमिर खानने ‘येक नंबर’ सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात आशुतोष गोवारीकर आणि राज ठाकरेंसह अनेक दिग्गज उपस्थित होते. याच कार्यक्रमात ‘लई भारी’ या सिनेमाची कथा एका हिंदी निर्मात्याने लिहिल्याचं आमिरला समजलं.

हेही वाचा…Bhool Bhulaiyaa 3 : मंजुलिका पुन्हा आली…! ‘भुल भुलैय्या ३’ मध्ये दिसणार कार्तिक-विद्याची अनोखी जुगलबंदी; टीझर प्रदर्शित

आमिरला बसला आश्चर्याचा धक्का

आमिर खान आणि साजिद नाडियादवाला हे राजेश मापुस्कर दिग्दर्शित ‘येक नंबर’ सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला हजर होते. याच कार्यक्रमात साजिद नाडियादवालाने ‘लय भारी’ या मराठी चित्रपटाची कथा स्वतः लिहिल्याचं सांगितलं. हा व्हिडीओ व्हायरल होतोय. जेव्हा साजिद नाडियादवाला सांगतो की, “ही कथा मी लिहिली आहे”, तेव्हा आमिर एकदा खाली पाहतो, नंतर हे समजल्यावर पटकन आश्चर्यचकित होऊन साजिदकडे पाहतो आणि बाजूला बसलेल्या लोकांना हे खरं आहे का असं चकित होऊन इशारा करत विचारतो. कार्यक्रमाच्या निवेदिकेने नंतर सांगितलं की, “आमिरला ही बातमी आत्ताच समजली आहे.”

साजिद आणि आमिरचं शाब्दिक द्वंद्व आणि हास्यविनोद

निवेदिका जेव्हा आमिरला ही बातमी आताच समजली आहे असं सांगते, तेव्हा साजिद नाडियादवाला म्हणतो की, “दुर्दैवाने निर्मात्यांना काही इज्जत नसते.” त्यावर आमिर साजिदच्या हातातून माईक घेत म्हणतो, “तुझ्या चेहऱ्याकडे पाहून मला वाटत नाही की ‘लय भारी’ची कथा तू लिहिली असशील.” त्यावर साजिद पुन्हा आमिरच्या हातून माईक घेऊन म्हणतो, “ही पहिली गोष्ट आहे जी मी चेहऱ्याने नाही लिहिली”, त्यानंतर स्टुडिओमध्ये एकच हशा पिकतो.

हेही वाचा…“मी ‘तुंबाड’साठी सात वर्षं दिली”, अभिनेता सोहम शाहचे वक्तव्य; आमिर खानचा उल्लेख करत म्हणाला, “माझं वय वाढत होतं; पण…”

‘लय भारी’ आणि ‘किक’चे दोन कनेक्शन आणि कोटींची कमाई

‘लय भारी’ हा सिनेमा ११ जुलै २०१४ रोजी प्रदर्शित झाला, ज्यात अभिनेता सलमान खानने कॅमिओ केला होता. साजिद नाडियादवालाने याची कथा लिहिली होती. तेव्हा तेरा दिवसांनी, म्हणजेच २५ जुलै २०१४ रोजी ‘किक’ सिनेमा प्रदर्शित झाला होता, ज्यात सलमान खान मुख्य भूमिकेत होता आणि या सिनेमाचं दिग्दर्शनही साजिद नाडियादवालाने केलं होतं. ‘लय भारी’ने ४१ कोटी रुपयांची कमाई केली होती, तर ‘किक’ने भारतात २३२ कोटी आणि जगभरात ४०२ कोटी रुपयांची कमाई केली होती. ‘किक २’ची घोषणा करण्यात आली असून, हा सिनेमा २०२५ साली प्रदर्शित होणार आहे.