बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित व बहुप्रतिक्षित चित्रपट ‘डंकी’ २१ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. ‘डंकी’ अगोदर शाहरुखचे प्रदर्शित झालेले पठाण व जवान चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटांच्या तुलनेत’ ‘डंकी’ची कमाई कमी झालेली दिसून येत आहे. तर दुसरीकडे प्रभासच्या ‘सालार’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करताना दिसून येत आहे. दरम्यान ‘डंकी’ व ‘सालार’च्या चौथ्या दिवसांच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
‘सॅकनिल्क’च्या रिपोर्टनुसार ‘डंकी’ने पहिल्याच दिवशी केवळ ३० कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घट बघायला मिळाली होती. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने फक्त २०.५ रुपयांचा व्यवसाय केला होता. तर तिसऱ्या दिवशी चित्रपटाने केवळ २६ कोटींचा गल्ला जमवला होता. आता ‘डंकी’च्या चौथ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत थोडीशी वाढ झाल्याचे बघायला मिळाले. चौथ्या दिवशी डंकीने ३१.५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. याबरोबर ‘डंकी’ची एकूण कमाई १०६.४३ कोटी रुपये झाली आहे.
यापूर्वी प्रदर्शित झालेल्या शाहरुख खानच्या ‘जवान’ चित्रपटाने चौथ्या दिवशी ९५.८ कोटींची कमाई केली होती तर ‘पठाण’ चित्रपटाने ५३.२५ कोटींचा व्यवसाय केला होता. या दोन्ही चित्रपटांच्या तुलनेत ‘डंकी’ची चौथ्या दिवसांची कमाई खूपच कमी असल्याचे दिसून येत आहे.
‘सालार’चा ‘डंकी’च्या कमाईवर परिणाम
प्रभासचा ‘सालार’ चित्रपटाच्या शाहरुखच्या ‘डंकी’वर परिणाम होताना दिसत आहे. एकीकडे ‘डंकी’च्या कमाईत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे तर दुसरीकडे प्रभासच्या सालारच्या कमाईत वाढ होत आहे. तीन दिवसात ‘सालार’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. पहिल्या दिवशी ‘सालार’ने ९० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ५६.७ कोटींचा व्यवसाय केला होता. तर तिसऱ्या दिवशी ‘सालार’ने ‘डंकी’पेक्षा दुप्पट म्हणजे ६१ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या तीन दिवसांमध्ये ‘सालार’ने भारतात २०८ कोटींचा व्यवसाय केला आहे तर जगभरात या चित्रपटाने ४०० कोटींचा आकडा पार केला आहे.