हिंदी चित्रपटसृष्टीत सलीम खान यांची ओळख केवळ सलमान खानचे वडील अशी नाही तर एक प्रसिद्ध लेखक अशीही आहे. २४ नोव्हेंबर १९३५ मध्ये जन्मलेले सलीम खान आज ८७ वा वाढदिवस साजरा करत आहेत. बॉलिवूडचे अनेक कलाकार स्टार होण्याचं श्रेय सलीम खान यांना जातं. जावेद अख्तर- सलीम खान ही एकेकाळची सर्वात गाजलेली जोडी होती. अनेक हिंदी चित्रपटांच्या स्क्रिप्ट या जोडीने लिहिल्या आहेत. पण एक वेळ अशी आली की ही प्रसिद्ध जोडी वेगळी झाली होती. याच दरम्यान काही रिपोर्ट्सनुसार अमिताभ बच्चन यांच्यामुळे सलीम- जावेद ही जोडी वेगळी झाली होती.
सलीम- जावेद यांच्या जोडीने अख्खं बॉलिवूड गाजवलं. अनेक कलाकार या जोडीमुळे सुपरहिट झाले. ज्यात अमिताभ बच्चन यांचंही नाव घेतलं जातं. या जोडीने अमिताभ बच्चन यांच्या ‘जंजीर’, ‘दीवार’, ‘शोले’ सारख्या चित्रपटांसाठी लेखन करत प्रेक्षकांमध्ये त्यांना ‘अँग्री यंग मॅन’ अशी ओळख मिळवून दिली. ‘शोले’, ‘त्रिशूल’, ‘यादों की बारात’ यांसारख्या हिट चित्रपटांच्या पटकथा लिहिल्यानंतर सलीम खान आणि जावेद अख्तर ही जोडी १९८१ मध्ये वेगळी झाली होती. ज्यामुळे बॉलिवूड सेलिब्रेटी आणि प्रेक्षक, चाहते सर्वांनाच धक्का बसला होता.
सलीम खान आणि जावेद अख्तर ही जोडी तुटल्यानंतर अर्थातच कालांतराने त्यांच्या वेगळ्या होण्याचा चर्चा कमी झाल्या पण जेव्हाही याबद्दल पुन्हा बोललं जातं तेव्हा अमिताभ बच्चन यांचं नावही चर्चेत येतं. २०१५ मध्ये दीपताकिर्ती चौधरी यांनी लिहिल्या ‘रिटन बाय सलीम जावेद : द स्टोरी ऑफ हिंदी सिनेमास ग्रेटेस्ट स्क्रीनराइटर’ पुस्तकात एक उल्लेख करण्यात आला आहे. ज्यात सलीम खान आणि जावेद अख्तर या जोडीबद्दल लिहिलंय आणि हे अनीता यांच्या एका मुलाखतीतून घेण्यात आलं आहे.
पुस्तकात उल्लेख करण्यात आलेल्या या कोटमध्ये म्हटलं गेलंय की जेव्हा सलीम- जावेद यांनी ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली तेव्हा त्या चित्रपटासाठी त्यांना अमिताभ बच्चन यांचा आवाज योग्य वाटत होता. या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन यांच्याशी संपर्क करण्यात आला होता. मात्र त्यांनी या चित्रपटाला नकार दिला. या चित्रपटाची संकल्पना त्या काळातील भारतीय चित्रपटसृष्टीसाठी पूर्णतः नवीन होती. ज्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. पण तरीही याची रिस्क घेण्यासाठी सलीम-जावेद आणि शेखर कपूर तयार होते. पण इतरांप्रमाणेच अमिताभ बच्चन यांनाही चित्रपटात अदृश्य होण्याची संकल्पना आवडली नव्हती. त्यांनी सांगितलं की, “प्रेक्षक मला पाहण्यासाठी चित्रपटगृहात येतात. त्यामुळे त्यांचा आवाज ऐकण्यासाठी चित्रपटगृहात येणार नाहीत.” असं म्हणून त्यांनी चित्रपटाला नकार दिला.
असं म्हटलं जातं की, सलीम खान यांना अमिताभ बच्चन यांचं हे वागणं अजिबात आवडलं नाही. कथितरित्या त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या नकाराला स्वतःचा अपमान समजला. त्यानंतर त्यांनी पुन्हा कधीच अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम न करण्याची शपथ घेतली आणि त्यानंतर सलीम- जावेद यांनीही पुन्हा कधीच एकत्र काम केलं नाही.