सलीम खान(Salim Khan) व जावेद अख्तर(Javed Akhtar) यांचे बॉलीवूडमध्ये मोठे योगदान आहे. बॉलीवूडमध्ये सलीम-जावेद ही जोडी मोठी प्रसिद्ध होती. या दोघांनी एकत्र एकापेक्षा एक चित्रपटांच्या कथा लिहित बॉलीवूड चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. बॉलीवूडमधील अँग्री यंग मॅन ही संकल्पना त्यांनी रूजू केली. त्यांनी लिहिलेल्या पटकथांचे अनेक चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजले. ‘जंजीर’, ‘शोले’, ‘दीवार’ हे त्या चित्रपटांपैकी एक आहेत. आजही या जोडीची लोकप्रियता मोठी आहे. आता सलीम खान यांनी एका मुलाखतीत जावेद अख्तर आणि त्यांनी व्यावसायिकदृष्ट्या वेगळे होण्याचा निर्णय का घेतला होता, यावर वक्तव्य केले आहे. १२ वर्षे एकत्र काम केल्यानंतर १९८२ ला त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

मी त्याला पुन्हा कधीही विचारलं नाही…

सलीम खान यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी जावेद अख्तर व ते व्यावसायिकदृष्ट्या वेगळे होण्यावर म्हणाले, “आजपर्यंत मलाही समजले नाही की आम्ही वेगळे का झालो, तर इतर कोणाला काय त्याबद्दल सांगणार? एकेदिवशी अचानक तो मला म्हणाला की, मला वेगळे व्हायचे आहे. आम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत एकत्र काम करायचो. जेव्हा त्याने वेगळे होण्याबद्दल विचारले, तेव्हा मला वाटले की मी त्याचे नीट ऐकले नाही. पण, त्याने मला त्याचा वेगळे होण्याचा विचार सांगितला. मी त्याला म्हणालो की, हा तुझ्या मनात अचानक आलेला विचार नसेल; तू यावर विचार केला असशीलच. त्याने मला सांगितले की तो यावर खूप दिवसांपासून विचार करत होता.”

याबद्दल अधिक बोलताना सलीन खान म्हणाले, “जावेदचे ते बोलणे ऐकल्यानंतर मी लगेच तिथून निघालो. तो मला गाडीपर्यंत सोडायला येत होता, पण त्याला म्हटले की मी स्वतःची काळजी घेऊ शकतो. माझ्या मनात त्याच्याप्रति कटवटपणा कधीही नव्हता. आमच्यामध्ये कोणतीच भांडणे नव्हती. आमची पार्टनरशिप होती आणि एक दिवस ती तुटली आणि कोणालाही माहीत नाही का आणि काय घडलं? मी त्याला पुन्हा कधीही विचारलं नाही की हे का घडलं? हे सगळं घडल्यानंतर विचारण्याचा काय फायदा, जेव्हा आम्ही वेगळे झालो. त्यानंतर त्याच्या अनेक चित्रपटांच्या घोषणा झाल्या.”

एक गमतीदार किस्सा सांगत सलीम खान म्हणाले, “अनेक लोकांना वाटायचे की सलीम-जावेद हे एक नाव आहे. एका अंध निर्मात्याने मला जावेद साहेब अशी हाक मारली होती. मी त्यांना कधीच हे सांगितले नाही की मी जावेद नाही. आम्ही ऑफिसमध्ये बसलो होतो, जावेद अख्तर त्यावेळी दारू पित असे. त्याला दारू जास्त झाली होती. तो मला म्हणाला की, सलीम साहेब त्यांना दिसत नसले तरी काय झाले, ते माझे चाहते आहेत. मी त्याला म्हणालो, ते तुझे चाहते आहेत, कारण ते अंध आहेत.”

दरम्यान, सलीन खान व जावेद अख्तर आजही वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा बॉलीवूडमधील प्रवास सांगणारी अँग्री यंग मॅन ही डॉक्युमेंटरी प्रदर्शित झाली होती. त्यामध्ये सलीम खान यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही अनेक किस्से सांगितले आहेत.