Salim Khan on Lawrence Bishnoi: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या शुटर्सने हल्ला करून त्यांची हत्या केली. सलमान खानशी संबंध असल्यामुळे बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्याचा दावा लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा सध्या तपास करत असून अटक केलेल्या आरोपींकडून आणखी माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. बिश्नोई टोळीकडून सलमान खानला याआधीही लक्ष्य केले गेले आहे. तसेच बाबा सिद्दीकी यांची हत्या केल्यानंतर पुन्हा एकदा सलमान खानला धमकी देण्यात आली, तसेच जीव वाचविण्यासाठी पाच कोटींची खंडणी मागण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सलमान खान यांचे वडील सलीम खान यांची बाजू आता समोर आली आहे. सलमान खानला ज्या धमक्या मिळत आहेत, त्याचा खान कुटुंबावर काय परिणाम होतो आहे, याबद्दल त्यांनी भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलीम खान यांनी एबीपी न्युजला नुकतीच एक मुलाखत दिली. त्यात त्यांना या धमक्या बद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, आमच्या घरावरही गोळीबार करण्यात आला होता. नक्कीच आमचे कुटुंबिय तणावात आहे. हे आम्ही नाकारत नाही. पण शेवटी होणार काय? त्यांची मागणी आहे की, सलमानने माफी मागावी. पण तो माफी का मागेल? त्याने काय गुन्हा केला. आम्ही तर कधी बंदुकही वापरली नाही. मग शिकार करण्याचा प्रश्नच येत नाही.

हे वाचा >> Salim Khan : “सलमानने कशासाठी माफी मागायची? त्याने काळवीट…”; सलीम खान नेमकं काय म्हणाले?

लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्यानंतर आता कुटुंबावर काही निर्बंध आलेत का? असाही प्रश्न सलीम खान यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, नक्कीच. कुटुंबाला आता बाहेर कुठे जायचे असेल तर सुरक्षा व्यवस्थेत बाहेर पडावे लागते. सरकारचीही ही जबाबदारी आहे की, आम्हाला सुरक्षा दिली पाहिजे. सलमानही या धमक्यांना घाबरत नाही. हा फक्त खंडणी उकळण्याचा प्रकार आहे.

हे ही वाचा >> Baba Siddique Murder: “हे तर सत्कर्म…”, सिद्दीकींच्या हत्येनंतर बिश्नोई गँगची कथित पोस्ट व्हायरल, सलमान खानलाही दिला इशारा

सलमान खान प्राण्यांवर प्रेम करणारा माणूस

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येशी सलमान खानच्या प्रकरणाचा काही संबंध आहे का? असाही एक प्रश्न या मुलाखतीमध्ये सलीम खान यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, बाबा सिद्दीकी यांचा सलमान खानच्या त्या प्रकरणाशी काहीही संबंध नव्हता. त्यामुळे ही हत्या सलमान खानशी संबंधित नाही. सलमान खान हा प्राण्यांवर प्रेम करतो. त्याच्याकडे एक श्वान होता. त्या श्वानाचा मृत्यू होईपर्यंत सलमानने त्याच्यावर प्रेम केले. श्वान मेल्यानंतर सलमान रडला. तेव्हाच मी त्याला विचारले होते, त्या काळवीटाला कुणी मारले? तो म्हणाला मी नाही मारले. मला माहितीये सलमान प्राण्यांवर प्रेम करणारा माणूस आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salim khan speaks on lawrence bishnoi gang threat to salman khan how family suffer kvg