बॉलीवूड अभिनेता सलमान खान आता ५९ वर्षांचा झाला आहे. मात्र, अद्यापही तो अविवाहित आहे. आजवर सलमानचे नाव बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रींबरोबर जोडले गेले आहे. त्याच्याशी नाव जोडलेल्या अनेक अभिनेत्रींची लग्नेही झालीत. अशात आता बॉलीवूडच्या भाईजानने ब्रेकअप झाल्यावर त्यातून स्वत:ला कसे सावरायचे याच्या काही टिप्स त्याचा पुतण्या अरहान खानला दिल्या आहेत.
सलमान खानने नुकतीच अरहान खानच्या ‘डंब बिर्यानी’ या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी मुलाखतीमध्ये अरहानचे सहकारी देव रैयानी आणि आरुष शर्मा हे दोघेही उपस्थित होते. सर्वांशी सलमान खानने मनसोक्त गप्पा मारल्या. तसेच या तिघांनाही ब्रेकअप अथवा विश्वासघात झाल्यास, त्यातून बाहेर कसं पडावं याबद्दलची माहिती दिली.
सलमान खान म्हणाला, “जर तुमच्या गर्लफ्रेंडनं तुमच्याबरोबर ब्रेकअप केलं असेल, तर तिला जाऊ द्या. तिला अडवू नका आणि बाय बाय म्हणा.” सलमान खानने या सर्वांची तुलना पुढे बँड -एडबरोबर केली. तो म्हणाला, “जेव्हा तुम्हाला एखादी जखम होते तेव्हा त्यावर लावलेलं बँड -एड तुम्ही कसं काढता? हळूहळू? नाही जोरात काढता. त्यामुळे अशाच पद्धतीने हा विषयसुद्धा संपवायचा असतो.”
“ब्रेकअप झाल्यावर घरामध्ये तुमच्या खोलीत जा आणि तुम्हाला हवं तितकं मनसोक्त भरपूर रडा. त्यानंतर हा विषय इथेच बंद करा. तसेच बाहेर गेल्यावर सामान्य प्रश्न विचारा. काय सुरू आहे? कसं सुरू आहे, असे प्रश्न विचारत नॉर्मल राहा”, असे सलमान खानने सांगितले आहे.
सलमान खानने पुढे विश्वासघात झाल्यावर अशा वेळी स्वत:ला कसे सावरायचे याच्या टिप्स सांगितल्या आहेत. तो म्हणाला, “कायम समोरच्या व्यक्तीचा आदर आणि सन्मान करा. ज्या ठिकाणी मान नसेल अशा ठिकाणी बसण्यात काहीच अर्थ नाही. एखाद्या नात्यात तुम्ही जास्तीत जास्त ४० ते ५० वर्षं वेळ घालवू शकता. नात्यांमध्ये जेव्हा तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आल्याचं तुम्हाला समजतं तेव्हा त्यावर पुढच्या ३० सेकंदांत निर्णय घेण्याची ताकद ठेवा. घडलेली गोष्ट सहा महिने आधीच तुम्हाला माहिती होती, अशी रिअॅक्शन द्या. त्यानंतर तो विषय तिथेच संपवा.” विश्वासघात प्रेमासह मैत्रीतही होतो, असेही सलमान खानने स्पष्ट केले आहे.
धन्यवाद आणि सॉरी महत्त्वाचे
पुढे सलमान खानने धन्यवाद आणि सॉरी हे दोन शब्द किती महत्त्वाचे आहेत तेदेखील सांगितले. तो म्हणाला, “जर तुम्ही काही चुकीचं वागला असाल, तर लगेच माफी मागा, सॉरी म्हणा. नात्यात आभार म्हणजेच धन्यवाद आणि सॉरी दोन्ही शब्द सहज बोलता येणं गरजेचं आहे.”