प्रसिद्ध उद्योजिका नीता अंबानी यांच्या ‘नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र’ चा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. अंबानी कुटुंबाच्या या कार्यक्रमात बॉलीवूडचे सर्व ए-लिस्टर्स स्टार्सही सहभागी झाले होते. झेंडाया, टॉम हॉलंड आणि गिगी हदीद या हॉलिवूड सेलिब्रिटींनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र, या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते ऐश्वर्या राय आणि सलमान खानच्या फोटोने. जवळजवळ २० वर्षानंतर हे दोघे एकाच फोटोमध्ये दिसून आले. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हेही वाचा- विवाहित चित्रपट निर्मात्याच्या प्रेमात पडलेल्या जया प्रदा; दोघांनी गुपचूप लग्नही केलं, पण…
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये शाहरुख खान आणि सलमान खान नीता अंबानी, टिम हॉलंड आणि झेंडयासोबत एका फ्रेममध्ये पोज देताना दिसत आहेत. त्याच फ्रेममध्ये ऐश्वर्या राय बच्चनही तिची मुलगी आराध्या बच्चनसोबत दिसत आहे. ऐश्वर्या फोटोत दिसत असली तरी तिचा चेहरा केसांनी झाकला आहे. तर आराध्याच्या चेहऱ्याचा बाजूचा भाग चित्रात स्पष्टपणे दिसत आहे.
सलमान आणि ऐश्वर्याला कदाचित माहितही नसेल की ते एकाच फ्रेममध्ये क्लिक झाले आहेत. मात्र वर्षांनंतर या दोघांना एकाच फ्रेममध्ये पाहिल्याने चाहते खूप खूश झाले आहेत आणि जोरदार कमेंटही करत आहेत. एकेकाळी सलमान आणि ऐश्वर्याच्या अफेअरची बी-टाऊनमध्ये खूप चर्चा होत होती. मात्र, काही काळानंतर हे जोडपे वेगळे झाले. ऐश्वर्या रायने नंतर अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लग्न केले. या जोडप्याला आराध्या बच्चन ही मुलगी आहे. तर सलमान खान अजूनही सिंगल आहे.