सध्या बिग बॉसच्या घरातील घडामोडींची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. शिवाय या कार्यक्रमात बरेच कलाकार त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी हजेरी लावत असतात. नुकतंच अभिनेत्री रेवतीने सलमानच्या ‘बिग बॉस’मध्ये हजेरी लावली आणि प्रेक्षकांसाठी ही एक वेगळीच पर्वणी ठरली.
बिग बॉस १६ च्या सेटवर काजोलने हजेरी लावली. तिच्या आगामी ‘सलाम वेंकी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी काजोल तिथे आली होती. अशातच सलमानने अचानक रेवतीला मंचावर आमंत्रित करत सगळ्यांना एक गोड सरप्राइज दिलं. सलमान आणि रेवती हे १९९० च्या ‘लव्ह’या चित्रपटात एकत्र झळकले होते. प्रेक्षकांना त्यांची जोडी चांगलीच पसंत पडली होती, पण नंतर मात्र या दोघांनी कधीच एकत्र काम केलं नाही.
आणखी वाचा : रोहित शेट्टीच्या बहुचर्चित ‘सर्कस’चा टीझर प्रदर्शित; ६० च्या दशकातील कहाणी आणि कॉमेडीचा डबल डोस
‘बिग बॉस १६’च्या सेटवर सलमानने रेवतीला आमंत्रित केलं आणि तिला पाहून सलमान जुन्या आठवणींमध्ये रमला. तब्बल ३० वर्षांनी त्यांनी त्यांच्या चित्रपटातील ‘साथीया तूने क्या किया?’ या गाण्यावर डान्सही केला. ३० वर्षांनी या दोघांना एकत्र एका मंचावर पाहून खूप लोकांना आनंद झाला. काजोलच्या ‘सलाम वेंकी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन रेवती करत आहे.
इतकंच नाही रेवतीला आमंत्रित केल्यावर सलमानने या मंचावर आणखी एक सरप्राइज दिलं. रेवती सलमानच्या ‘टायगर ३’ मध्ये झळकणार असल्याचं सलमानने जाहीर केलं. हे ऐकून काजोलही आश्चर्यचकित झाली. अर्थात रेवती नेमकी कोणत्या भूमिकेत दिसणार आहे हे अजूनतरी स्पष्ट झालेलं नाही. रेवतीबरोबरच शाहरुख खानही सलमानच्या ‘टायगर ३’मध्ये छोट्याशा भूमिकेत दिसणार आहे. काजोल आणि विशाल जेठावा यांचा ‘सलाम वेंकी’ ९ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.