बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’मध्ये सलमानने त्याच्या चाहत्यांना दर्शन दिलं आणि या दोघांना एकत्र पाहायची कित्येकांची इच्छा पूर्ण झाली. याबरोबरच सलमानच्या आगामी चित्रपटांची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे. त्यापैकी ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातील एक गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे.
या चित्रपटाचा टीझर ‘पठाण’बरोबरच सादर करण्यात आला होता, आता यातील हे नवं पहिलं गाणं ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘नैयो लगदा’ हे एक रोमॅंटिक गाणं आहे आणि हे गाणं सलमान खान आणि पूजा हेगडेवर चित्रित झालं आहे. यापाठोपाठ नुकतंच सलमानने या चित्रपटातील पुढील गाण्याचा प्रोमो सादर केला आहे.
आणखी वाचा : “चित्रपट आणि टेलिव्हिजन यात…” दूरदर्शनवरील मालिकेतून कमबॅक करणाऱ्या सुभाष घई यांचं वक्तव्य
‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार या चित्रपटाचं खास स्क्रीनिंग सलमान खानने नुकतंच आयोजित केलं असल्याचं वृत्त समोर आलं आहे. आपले काही खास मित्र आणि कुटुंब यांच्यासाठी सलमान खानने ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाचा पहिला कट तयार केला आणि त्याचं स्क्रीनिंग केलं. बांद्राच्या सोहेल खानच्या स्टुडिओमध्ये हे स्क्रीनिंग पार पडलं असून सलमानच्या मित्र मंडळी आणि कुटुंबाला हा चित्रपट आवडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हा एक ‘फॅमिली एंटरटेनर’ चित्रपट असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवाय सलमानच्या कुटुंबीयांनी काही छोटे बदलसुद्धा यात सुचवले आहेत.
सलमानच्या ‘टायगर ३’प्रमाणेच त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटातील सलमानचा लूकसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. हा चित्रपट २१ एप्रिल २०२३ रोजी झळकणार आहे. भाईजानचे चाहते त्याच्या या चित्रपटाची चातकाप्रमाणे वाट बघत आहेत.