Salman Khan on Lawrence Bishnoi Death Threats : बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानसाठी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या धमक्या नवीन नाही. सलमान खानचे जवळचे मित्र व राजकीय नेते बाबा सिद्दीकी यांची बिश्नोई गँगने ऑक्टोबर २०२४ मध्ये गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. त्याने ‘बिग बॉस’चं शुटिंगही कडक सुरक्षा बंदोबस्तात केलं होतं. त्या घटनेनंतर पहिल्यांदाच त्याचा ‘सिकंदर’ चित्रपट येणार आहे. त्याचा ग्रँड ट्रेलर लाँच ठेवण्यात आला होता, पण सलमानच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तो रद्द करण्यात आला. आता सलमानने ‘सिकंदर’च्या एका इव्हेंटमध्ये त्याला मिळणाऱ्या धमक्यांबद्दल मौन सोडलं आहे.

सलमान खान सध्या ‘सिकंदर’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्याने या सिनेमाच्या निमित्ताने मुंबईत काही मोजक्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्याला बरेच प्रश्न विचारण्यात आले. तुला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत, तर भीती वाटत नाही का? असं सलमान खानला विचारण्यात आलं. उत्तर देत सलमान म्हणाला, “सगळं देव, अल्लाह यांच्यावर आहे. जेवढं आयुष्य जगणं नशिबात असेल तेवढं असेल. एवढंच. काही काही वेळा इतक्या लोकांना सोबत घेऊन चालावं लागतं, तीच एक अडचण आहे.”

१९९८ मध्ये ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानने काळवीटाची शिकार केल्याच्या आरोप झाला होता. सलमान खानने या गोष्टीला नकार दिला होता. या प्रकरणी सलमानला २००६ मध्ये एका वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर जोधपूर कोर्टाने त्याला ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर एप्रिल २०१८ मध्ये सलमानला ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन दिला होता. दुसरीकडे राजस्थान हायकोर्टाने त्याची २०१६ मध्येच निर्दोष मुक्तता केली होती.

salman khan house firing
सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराचा फोटो

२०१८ मध्ये लॉरेन्स बिश्नोईने म्हटलं होतं की तो सलमान खानचा जीव घेईल. “आम्ही सलमान खानला मारून टाकू. मी आतापर्यंत काही केलं नाही, पण मी त्याला सोडणार नाही,” असं तो म्हणाला होता. दरम्यान, सलमान खानच्या मुंबईतील वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर एप्रिल २०२४ मध्ये गोळीबार झाला होता. या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली होती. त्यानंतर काही महिन्यांनी सलमानचे जवळचे मित्र बाबा सिद्दीकी यांचीही मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येची जबाबदारी बिश्नोई गँगनेच घेतली होती.