Salman Khan Ex Girlfriend Somy Ali Statement : ९० च्या दशकात काही वर्षे सलमान खानने अभिनेत्री सोमी अलीला डेट केलं होतं. सलमान आणि संगीता बिजलानी यांचं लग्न मोडण्यास सोमी अली कारणीभूत ठरली होती असं तिने काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत सांगितलं होतं. सध्या ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे, सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी मिळाल्यावर सोमीने बिश्नोईसाठी एक सोशल मीडियावर पोस्ट लिहिली होती. या पोस्टमधून अभिनेत्रीने बिश्नोईशी झूम कॉलवर बोलायचंय असं म्हटलं होतं. यानंतर सोमीला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्रीने ‘इंडिया टुडे’शी संवाद साधला. याशिवाय काळवीट शिकार प्रकरणावर देखील तिने भाष्य केलं आहे.
सोमीने या मुलाखतीत, सलमानला ( Salman Khan ) बिश्नोई समाजात काळवीटांची पूजा करतात याबद्दल काहीच माहिती नव्हती असा दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणी त्याने माफी मागण्याचं काहीच कारण नाही असंही तिने म्हटलं आहे. अभिनेत्री म्हणाली, “त्याला माहीत नसलेल्या गोष्टीबद्दल त्याने माफी का मागावी? हे अनावधानाने झालं असेल आणि त्याच्यासाठी सलमानला माफी मागायला लावणं… याला काहीच अर्थ नाहीये. यात सलमानला अहंकार असण्याचा संबंधच नाहीये…लोक म्हणतात त्याला ( सलमान ) इगो आहे, तो गर्विष्ट आहे…पण, असं नाहीये. मला त्याच्याशी किंवा त्याच्या कुटुंबाशी देणंघेणं नाही. पण, या सगळ्याचं उत्तर हिंसा हे कधीच असू शकत नाही.”
सलमानला ‘त्या’ गोष्टीबद्दल माहिती नव्हतं
सोमी पुढे म्हणाली, “सलमान हा खूपच दयाळू माणूस आहे. त्याच्याकडे एक एनजीओ आहे… त्याला त्यावेळी खरंच त्या जमातीत प्राण्यांची पूजा केली जाते हे माहिती नव्हतं आणि तुम्हाला काय वाटतं? त्या भागात शिकार करणारा सलमान हा एकमेव व्यक्ती असेल का? खरंतर, तो सलमान खान आहे म्हणून ते लोक त्याच्या मागे लागले आहेत. बिश्नोई समुदायाने या सगळ्या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. सलमानला ( Salman Khan ) बिश्नोई समाजात काळवीटांची पूजा केली जाते हे तेव्हा माहिती नव्हतं, ही गोष्ट मी खात्रीपूर्वक सांगू शकते.”
सोमीने आपल्या पोस्टमध्ये लॉरेन्सला झूम कॉल करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती… या पोस्टचा सर्वांनी चुकीचा अर्थ लावला हे सांगताना अभिनेत्री म्हणाली, “माझ्या पोस्टचा सर्वांनी चुकीचा अर्थ लावला. मी आता लॉस एंजेलिसमध्ये सक्रियपणे सामाजिक कार्य करते. या कार्याचा भाग म्हणून मी अनेकदा पीडित किंवा गुन्हेगारांना भेटते. लॉरेन्स बिश्नोई भारतीय तुरुंगांमध्ये झूम कॉलचा वापर करतोय हे ऐकून मला आश्चर्य वाटलं कारण, अमेरिकेच्या तुरुंगात या सगळ्याला परवानगी नाही. मी या सगळ्याची चेष्टा करत होते. झूम कॉल वगैरे केला जातो हे वाचून मला धक्का बसला होता.”
लॉरेन्स बिश्नोईशी संवाद साधणार
“माझ्याकडे ब्रॉडकास्ट पत्रकारिता आणि मानसशास्त्राची पदवी आहे. मी त्या क्षेत्रात प्रशिक्षण घेत आहे. मला असं समजलं की, फेब्रुवारी २०२४ मध्ये बिश्नोईची एक मुलाखत घेण्यात आली होती. त्यामुळे भारतात आल्यावर मीडियासमोर मला त्याच्याशी प्रत्यक्ष संवाद साधायचा आहे. यासाठी मी नक्की प्रयत्न करेन. सलमानशी आणि त्याच्या कुटुंबाशी माझा आता काहीच संबंध नाहीये, मला प्रसिद्धी सुद्धा नको. मी शेवटचं त्याच्याशी २०१२ मध्ये बोलले होते. मला फक्त एकच गोष्ट हवीये ती म्हणजे कोणाचा खून होऊ नये. मला सलमानबद्दल ( Salman Khan ) तितकीच काळजी आहे जितकी मला रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाबद्दल असेल.” असं सोमीने सांगितलं.
हेही वाचा : भेटला विठ्ठल माझा…; सूरज पोहोचला केदार शिंदेंच्या घरी! ‘गुलीगत किंग’ला दिली खास भेटवस्तू, Video एकदा पाहाच
सोमीने बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी शोक व्यक्त केला. तसेच अभिनेत्री शेवटी म्हणाली, “सलमानच्या ( Salman Khan ) वतीने मी बिश्नोई समाजाची माफी मागते. तुम्ही काळवीटाची पूजा करता हे त्याला माहीत नव्हतं. मी भारतात येऊन तुमच्या मंदिराला भेट देईन. मी तिथे पूजा करेन आणि तुमच्या मंदिराला दानही देईन.”