शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाणं गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालं आणि वादात सापडलं. काहींनी गाण्याच्या बोलांवर आक्षेप घेतले, तर काहींनी गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या बिकिनीच्या रंगांवर आक्षेप घेतले. वाद इतका वाढला की दृश्यांमध्ये बदल न केल्यास चित्रपट मध्य प्रदेशमध्ये प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशाराही तिथले गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिला. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकार या वादावर बोलताना दिसत आहेत. अशातच माजी अभिनेत्री आणि सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली हिनेही या वादावर प्रतिक्रिया नोंदवली आहे.
सोमी अलीने लिहिले, “हा चित्रपट आणि हे गाणे पाहण्यासाठी मी वाट बघू शकत नाही! यामध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत आहे. वर्कआउट करताना अधिक मेहनत घेण्यासाठी वैयक्तिकरित्या दीपिका माझ्यासाठी एक मोठी प्रेरणा बनली आहे.” तिने मध्य प्रदेशच्या मंत्र्याला अशिक्षित असा उल्लेख केला आणि म्हणाली, “काहीतरी चांगलं काम करा. भारतात दररोज लैंगिक तस्करीसाठी विकल्या जाणाऱ्या मुलांवर लक्ष केंद्रित करा. देशातल्या स्त्रिया घरगुती हिंसाचाराला आणि अत्याचाराला बळी पडत आहेत. लहान मुलं आणि मुली लैंगिक आणि शारीरिक अत्याचाराला बळी पडत आहेत. लोक उपासमारीने जीव गमावत आहेत. महिलांवर दररोज बलात्कार होत असल्याची आकडेवारी समोर येत आहे. त्यामुळे कलाकारांबद्दल बोलण्यापेक्षा आयुष्यातील तुमचे प्राधान्यक्रम तपासा आणि लोकांना अधिक कसरत करण्यासाठी प्रोत्साहित करण्याव्यतिरिक्त, या गाण्यात किंवा चित्रपटात काहीही चुकीचं नाही. तुम्ही तुमचा प्राधान्यक्रम तपासा आणि त्याची सुरुवात चांगल्या शिक्षणापासून करा,” असं सोमीने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय.
मध्य प्रदेशातील मैहरचे आमदार नारायण त्रिपाठी यांनी ‘पठाण’ चित्रपटावर बंदी घालण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिलं आहे. “चित्रपटात भगवा रंग चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला असून चित्रपट निर्मात्यांनी आमच्या देवतांची विटंबना करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चित्रपटातून आक्षेपार्ह गाणी आणि दृश्ये काढून टाकण्यासाठी किंवा देशभरात चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्यासाठी मंत्रालयाने आदेश द्यावेत,” अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली होती.