ईदच्या मुहूर्तावर ३० मार्च रोजी अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि रश्मिका मंदाना यांचा बहुचर्चित ‘सिकंदर’ (Sikandar) हा चित्रपट प्रदर्शित झाला. परंतु बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अपेक्षित कमाई करताना दिसत नाहीये. या चित्रपटाची पहिल्या दिवशी ठिकठाक सुरुवात झाली होती. दुसरा दिवस ईदचा असल्याने त्याचा कमाईसाठी चांगला फायदा झाला. पण त्यानंतर देशातील काही ठिकाणी प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद मिळाल्याने ‘सिकंदर’चे शोज रद्द करण्यात आले.

‘सिकंदर’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सलमान चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाला. प्रमोशन दरम्यान, बॉलीवूडधून इतर कोणीही त्याला पाठींबा देताना दिसलं नाही. दरम्यान कोणाकडूनही पाठिंबा न मिळाल्याबद्दल सलमानने प्रतिक्रिया दिली आहे. ‘बॉलीवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने ‘सिकंदर’ला न मिळालेल्या पाठिंब्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसंच त्याने सनी देओलच्या ‘जाट’ आणि मोहनलालच्या ‘एम्पुरान’बद्दलही वक्तव्य केलं.

यावेळी सलमानला विचारण्यात आलं की, जेव्हा एखादा नवीन चित्रपट येतो, तेव्हा सलमान त्या चित्रपटासाठी पोस्ट करतो. त्याला पाठिंबा दर्शवतो. पण सलमानच्या चित्रपटाला कोणी इतर कलाकार पाठींबा देताना दिसत नाहीत. यावर सलमानने “कदाचित त्यांना असं वाटत असेल की, मला याची गरज नसेल. पण सर्वांनाच कधीना कधी एकमेकांची गरज भासते’ असं म्हणत काहीशी नाराजी व्यक्त केली.

पुढे सलमानने त्याच्या सहकलाकारांच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगितले. त्याने सनी देओलच्या आगामी ‘जाट’चा उल्लेख केला, जो १० एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. शिवाय ‘एल२: एम्पूरन’चाही उल्लेख केला, जो ‘सिकंदर’च्या फक्त दोन दिवस आधी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे आणि कलाकारांचे सलमानने कौतुक केलं.

बॉलीवूडमधून अभिनेता सनी देओलने ‘सिकंदर’चे प्रमोशन केले. सलमानच्या ‘सिकंदर’साठी त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट पोस्ट केली. तर आमिर खानने सलमान आणि दिग्दर्शक एआर मुरुगादोस यांच्याबरोबर खास व्हिडीओ शेअर करत पाठींबा दिला. मात्र या व्यतिरिक्त सलमानला इतर कोणाकडूनही पाठिंबा मिळाला नाही.

दरम्यान, सलमानच्या ‘सिकंदर’च्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर चौथ्या दिवशी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर १० कोटीदेखील कमावता आलेले नाहीत. या चित्रपटाने चौथ्या दिवशी फक्त ९.७५ कोटींचा गल्ला जमावला असल्याचं वृत्त ‘सॅकनिल्क’ने दिलेलं आहे. चित्रपटच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये चौथ्या दिवशी तब्बल ५० टक्क्यांनी घट झाली आहे.