चित्रपटसृष्टीशी निगडीत एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. अजय देवगणचा ‘प्यार तो होना ही था’पासून सलमान खानच्या ‘रेडी’ पर्यंत कित्येक सुपरहीट चित्रपटांची कथा लिहिणारे लेखक इकराम अख्तर यांना नुकतीच अटक झाली असल्याची बातमी समोर येत आहे. अटक करून त्यांना मुरादाबाद येथील तुरुंगात पाठवण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध एका बिल्डरने दीड कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला होता.
याच आरोपासाठी त्यांना अटक करण्यात आली असून आता २२ सप्टेंबरपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात येणार आहे. इकरान हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक, निर्माते व दिग्दर्शक आहेत. याबरोबरच अभिनयाचं प्रशिक्षण देणारी त्यांची संस्थाही आहे. त्यांनी ‘रेडी’, ‘थॅंक यु’, ‘नो प्रॉब्लम’, ‘नई पडोसन’, ‘चलो इश्क लडाएं’, ‘जोरू का गुलाम’सारख्या कित्येक हिट चित्रपटांचे लेखन केले आहे.
आणखी वाचा : “मी नास्तिक आहे पण…” सामाजिक वातावरण गढूळ होण्याविषयीचं अनुराग कश्यपचं वक्तव्य चर्चेत
मुरादाबादचे बिल्डर कुलदीप कत्याल यांनी इकराम यांना ‘आय लव्ह दुबई’ या त्यांच्या चित्रपटासाठी दीड कोटी रुपये दिले होते. पैसे घेऊन चित्रपट पूर्ण न केल्याचा त्या बिल्डरने आरोप इकराम यांच्यावर केला आहे. जेव्हा इकराम यांनी पैसे परत करण्यासाठी दीड कोटींचा चेक कुलदीप यांना दिला तेव्हा तो बाऊन्स झाला. यामुळेच कुलदीप यांनी २०१६ मध्येच इकराम विरोधात कोर्टात केस केली. याच केसमध्ये २०१७ साली इकराम यांना एकदा अटक झाली होती, पण ते जामिनावर सुटले.
जामिनावर सुटल्यापासून आत्तापर्यंत इकराम एकाही सुनावणीसाठी हजर राहिले नसल्याने अखेर त्यांना या महिन्यात अटक करण्यात आली. इकराम अख्तर यांच्या वकिलांचं म्हणणं आहे की ते बनवत असलेल्या चित्रपटात कुलदीप यांना मुख्य भूमिका साकारायची होती. इतकंच नव्हे तर त्यांना आपल्या गर्लफ्रेंडला हिरॉईन म्हणून पुढे आणायचे होते. चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण व्हायला आलं होतं, तेव्हा कुलदीप अन् त्यांच्या गर्लफ्रेंडचं ब्रेक अप झालं. यानंतर कुलदीप यांनीच चित्रपट पूर्ण करण्यास नकार दिल्याचं इकराम यांच्या वकिलांनी स्पष्ट केलं आहे.