Salman Khan Fan Viral Video: अखेर सलमान खानचा बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘सिकंदर’ चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. चित्रपटाचा धमाकेदार टीझर, ट्रेलर आणि गाण्यांनंतर आजपासून ‘सिकंदर’ प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. “ब्लॉकबस्टर चित्रपट”, “परफेक्ट ईद गिफ्ट”, “‘टायगर जिंदा हैं’नंतर ‘सिकंदर’ चित्रपटात सलमान खानचा जबरदस्त एन्ट्री सीन”, “‘सुलतान’पेक्षाही ‘सिकंदर’ भारी आहे… खूप चांगला संदेश दिला आहे”, अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया ‘सिकंदर’ चित्रपटाबाबत सोशल मीडियावर उमटल्या आहेत. दुसऱ्या बाजूला भाईजानच्या जबरा फॅनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सलमान खानच्या जबरा फॅनने ‘सिकंदर’ चित्रपट (Sikandar Movie ) प्रदर्शित होण्यापूर्वी असं काही केलं की सध्या त्याची चर्चा सुरू आहे. या जबरा फॅनचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. ‘इन्स्टंट बॉलीवूड’च्या इन्स्टाग्राम पेजवर भाईजानच्या जबरा फॅनचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

व्हिडीओमधील सलमानच्या जबरा फॅनचं नाव कुलदीप सिंह (Kuldeep Singh ) आहे, जो राजस्थानच्या झुमरूमधील आहे. या कुलदीपने ‘सिकंदर’ प्रदर्शित होण्यापूर्वी ८१७ चित्रपटाची तिकिटं खरेदी केली आणि लोकांना ती मोफत वाटली. कुलदीप सिंहने ‘सिकंदर’ चित्रपटाची ८१७ तिकिटं १.७२ लाख रुपयांत खरेदी केली. ‘द फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार, सलमानच्या या जबरा फॅनने ही तिकिटं गेटी गॅलेक्सी चित्रपटगृहाबाहेर लोकांना मोफत वाटली. ही मोफत तिकिटं घेण्यासाठी लोकांची मोठी रांग व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

कुलदीप सिंहचा दावा आहे की, याआधीही सलमान खानच्या बऱ्याच चित्रपटांसाठी त्याने असं केलं आहे. ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ आणि ‘किसी का भाई किसी की जान’सारख्या चित्रपटांची तिकिटं त्याने मोफत वाटली आहेत.

दरम्यान, ‘सिकंदर’बद्दल बोलायचं झालं तर, ‘गजनी’ चित्रपटाचे दिग्दर्शक ए. आर. मुरगादॉस यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात सलमान खानने पहिल्यांदाच दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानासह स्क्रीन शेअर केली आहे. ‘सिकंदर’मध्ये सलमान, रश्मिका व्यतिरिक्त काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर झळकले आहेत. तसंच ‘बाहुबली ‘चित्रपटातील कटप्पा म्हणजे अभिनेता सत्यराज खलनायकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.