बॉलिवूडचा भाईजान सलमान खान याची क्रेझ आजही तितकीच आहे. तब्बल ३ दशकं सलमान प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. आज सलमान त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतातील ‘Most eligible bachelor’ अशीही त्याची ओळख आहे. सलमान त्याचे चित्रपट, त्याची स्टाइल, त्याचे ट्रेंड, त्याची कामाची पद्धत यामुळे चर्चेत असतो.
यावर्षीसुद्धा सलमानच्या वाढदिवसासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्सुक दिसले. रात्री सलमानच्या घराबाहेर तसा शुकशुकाट होता, कारण सलमानने त्याच्या खास मित्रपरिवार आणि कुटुंबियांसाठी मुंबईत एक जंगी पार्टी आयोजीत केली होती. त्यामुळे सलमानच्या घराबाहेर यंदा रात्री गर्दी पाहायला मिळाली नाही.
नुकतंच संध्याकाळी सलमानने त्याच्या बांद्राच्या ‘गॅलक्सि अपार्टमेंट’च्या बाल्कनीत येऊन त्याच्या चाहत्यांना झलक दिली. त्यावेळी मात्र सलमानच्या घराबाहेर त्याच्या चाहत्यांनी तोबा गर्दी केली होती. चाहत्यांना अभिवादन करतानाचा सलमानचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. सलमानची एक झलक बघण्यासाठी एवढी गर्दी जमली की तिथे उपस्थित असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना गर्दी पांगवायला लाठी चार्ज करावा लागला.
सलमान चाहत्यांना भेटून पुन्हा आत गेल्यावर मात्र पोलिसांनी काही हौशी चाहत्यांना लाठीचा चांगलाच प्रसाद दिला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सलमान खानच्या ‘टायगर ३’ आणि ‘किसीका भाई किसीकी जान’ या दोन चित्रपटांसाठी त्याचे चाहते चांगलेच उत्सुक आहेत.