अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांची पत्नी म्हणजेच सलमानची आई सलमा यांचं लग्नाआधीच नाव सुशील चरक होतं. त्या एका हिंदू कुटुंबातील आहे. पण लग्नानंतर सलमानच्या वडिलांना सासरचे सर्वजण शंकर या नावाने हाक मारायचे. सलमान खानचे वडील सलीम खान यांनी अरबाज खानच्या ‘द इनव्हिसिबल विथ अरबाज खान’ या शोमध्ये त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल बरेच खुलासे केले आहेत. त्यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यात रामायण आणि महाभारत यांचं असलेलं महत्त्व आणि शंकर या नावाचा किस्साही सांगितला.
अरबाज खानच्या शोमध्ये सलीम खान यांनी त्यांची दोन लग्न, करिअर आणि खासगी आयुष्याशी संबंधित सर्वच मुद्द्यांवर चर्चा केली. या मुलाखतीत त्यांनी सलमा आणि स्वतःची लव्हस्टोरी सांगितली. ज्या ठिकाणी सलीम खान राहायचे तिथेच सुशीला याचं घर होतं. दोघांची मैत्री झाली आणि मग प्रेमात पडले. एकमेकांना लपूनछपून भेटणं सुरू झालं. पण एक दिवशी सलीम खान यांनी ठरवलं की सुशीला यांचं घराच्यांकडे लग्नासाठी मागणी घालायची. कारण त्यांना असं लपून भेटणं योग्य वाटत नव्हतं.
आणखी वाचा- “माझा हेतू चुकीचा…”, हेलनशी दुसऱ्या लग्नाबद्दल अखेर सलमानच्या वडिलांनी सोडलं मौन
सलीम खान जेव्हा लग्नासाठी मागणी घालण्यासाठी सुशीला यांच्या घरी गेले तेव्हा त्याचं संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं. ते खूप त्रासले होते. सुशीला यांच्या कुटुंबाने सलीम यांची चौकशी केली होते. त्यानंतर सुशीला यांचे वडील म्हणाले की, “बेटा, तुझं घर, कुटुंब चांगलं आहे. आजकाल चांगली मुलं लवकर मिळत नाहीत. पण तुझा धर्म आम्हाला चालणार नाही.” त्यावर सलीम खान त्यांना म्हणाले, “तुमच्या मुलीला माझ्या घरात १७६० समस्या येतील पण यामध्ये धर्माचं नाव कुठेच नसेल, धर्मामुळे कोणतीही समस्या येणार नाही.” सलीम यांच्या या उत्तरावर सुशीला यांच्या लग्नासाठी त्यांचे कुटुंबीय तयार झाले.
आणखी वाचा- कॅन्सरशी झुंज, उपचारासाठी नाहीत पैसे अन्…; प्रसिद्ध अभिनेत्यासाठी सहकलाकरांनी दिली मदतीची हाक
लग्नानंतर सुशीला यांचं नाव बदलून सलमा असं करण्यात आलं. पण सलीम खान यांना सासरीची मंडळी शंकर या नावाने हाक मारायचे. मग हे नाव नेमकं कसं काय पडलं याचा किस्सा सलीम खान यांनी सांगितला. ते म्हणाले, “सलमाच्या घरी एकटी तिची आजी होती जिने आमच्या लग्नाला विरोध केला नाही. तिने मला पाठिंबा दिला. ती नेहमीच मला शंकर याच नावाने हाक मारायची. त्यामुळे नंतर हेच नाव सर्वांनी घ्यायला सुरुवात केली.” यावेळी सलीम खान यांनी रामायण आणि महाभारताचं त्यांच्या आयुष्यात किती महत्त्व आहे हेही सांगितलं. ते म्हणाले, “मी लिखाण करत असताना मला याचा खुप फायदा झाला आहे. जेव्हा कधी मला काहीच सुचत नाही आणि मी लिखाणात कुठे तरी अडखळतो, तेव्हा असा विचार करतो की रामायण किंवा महाभारतात अशा स्थितीत काय घडलं होतं. ही दोन्ही महाकाव्य जगातील सर्वात महान लिखाणापैकी एक आहेत.”
आणखी वाचा- “चित्रपट फ्लॉप झाला तर…” सलमानसाठी कथा न लिहिण्यामागचं वडील सलीम खान यांनी सांगितलं कारण
दरम्यान सलीम खान यांनी ‘जंजीर’, ‘दीवार’, ‘क्रांती’ आणि ‘शोले’ यांसारख्या चित्रपटांसाठी लेखन केलं होतं. जावेद अख्तर यांच्यासोबत त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत स्क्रिप्ट आणि चित्रपटाच्या कथांमध्ये क्रांती घडवून आणली. १८ नोव्हेंबर १९६४ रोजी त्यांनी सुशीला चरक (सलमा खान) यांच्याशी विवाह केला. सलीम यांनी प्रसिद्ध अभिनेत्री हेलनबरोबर दुसरं लग्नही केलं होतं. ८७ वर्षीय सलीम खान यांचा जन्म २४ नोव्हेंबर २९३५ रोजी मध्य प्रदेशातील बालाघाट येथे झाला. त्यांची तीन मुलं सलमान खान, अरबाज खान आणि सुहेल खान हे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते आहेत, ज्यापैकी सलमान खान सर्वात यशस्वी अभिनेता ठरला आहे.