बॉलिवूड अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अरबाज खानचा नवीन शो ‘द इनव्हिसिबल विथ अरबाज खान’ सध्या बराच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या शोचा टीझर प्रदर्शित झाला होता. या शोसाठी अरबाज खानचे पहिले पाहुणे त्याचे वडील सलीम खान असणार आहेत. बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक आणि अभिनेते सलीम खान यांनी त्याच्या किरअरबरोबरच खासगी जीवनातील अनेक किस्से उघड केले आहेत.
सलीम खान यांनी या शोमध्ये मुलगा अरबाज खानसमोर त्यांच्या दोन लग्नांवर भाष्य केलं. तसं तर सर्वांनाच माहीत आहे की सलीम खान यांनी दोन लग्न केली आहेत. त्यांचं पहिलं लग्न सुशील चरक म्हणजे सलमान खानची आई सलमा यांच्याशी १८ नोव्हेंबर १९६४ मध्ये झालं होतं. पण विवाहित असूनही सलीम खान यांनी अभिनेत्री हेलन यांच्याशी १९८१ मध्ये दुसरं लग्न केलं. आता विवाहित असूनही दुसरं लग्न कारण सलीम खान यांनी अरबाज खानच्या शोमध्ये सांगितलं आहे.
हेलन यांच्याबरोबरच्या नातेसंबंधांबद्दल जेव्हा अरबाजने सलीम खान यांना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले, “ती तरुण होती. मी तरुण होतो आणि माझा हेतू कधीच चुकीचा नव्हता. मी तिची मदत करण्यासाठी हात पुढे केला होता. तो एक भावनिक अपघात होता आणि हे कोणाबरोबरही घडू शकतं.”
दरम्यान १९८० च्या काळात हेलन आणि सलीम खान यांच्या अफेअरच्या जोरदार चर्चा झाल्या होत्या. सलीम खान यांनी या शोमध्ये हेही सांगितलं की त्यांचं हेलनशी असलेलं नातं सर्वांनीच स्वीकारलं नव्हतं. हेलन आणि सलीम खान यांना स्वतःचं मूल नाही त्यांनी अर्पिता खानला दत्तक घेतलं आहे. तर पहिली पत्नी सलमापासून सलीम खान यांना सलमान, अरबाज, सोहेल आणि अल्वीरा खान अशी चार मुलं आहेत.