सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटवर १४ एप्रिल रोजी दोन अज्ञातांनी दुचाकीवरून येत गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. तसेच अभिनेत्याचे लाखो चाहते सुद्धा चिंतेत होते. सलमानच्या घरावर हल्ला झाल्याचं समजताच रविवारी सकाळी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तात्काळ तपास सुरू करत पुढे ४८ तासांच्या आत गुजरातमधून दोन्ही संशयित हल्लेखोरांना अटक केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी या दोन्ही आरोपींना मंगळवारी मुंबईत आणून न्यायालयात हजर केलं. पोलिसांनी त्यांच्या रिमांड नोटमध्ये सलमान खानला जीवे मारण्याच्या उद्देशाने हा गोळीबार करण्यात आला होता असं स्पष्टपणे म्हटलं आहे. रविवारी पहाटे गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करून विकी गुप्ता (२४) आणि सागर पाल (२१) पसार झाले होते. हे दोघेही बिहारचे रहिवासी आहेत. त्यांना सोमवारी (१५ एप्रिल ) रात्री उशिरा गुजरातमधील माता नो मध गावातून अटक करण्यात आली. यासंदर्भात पोलिसांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.

हेही वाचा : “सरकार त्याच्या पाठीशी”, सलमान खानची भेट घेतल्यावर काय म्हणाले मुख्यमंत्री? अभिनेत्याला दिलं आश्वासन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेच्यावेळी विकी गुप्ता दुचाकी चालवत होता आणि त्याच्या मागे बसलेल्या सागर पालने सलमानच्या घरावर गोळीबार केला. या दोघांना मंगळवारी दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. यानंतर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी एल.एस.पडेन यांनी दोन्ही आरोपींना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

मुंबई गुन्हे शाखेने यावेळी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड नोटमध्ये “दोन्ही आरोपींनी अभिनेत्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने हा गोळीबार केला होता. परंतु, या घटनेमागे असलेल्या मास्टरमाइंडची ओळख पटवण्यासाठी आणि यामागचा हेतू शोधण्यासाठी या आरोपींची कोठडीत चौकशी होणं आवश्यक आहे.” असं म्हटलं आहे. याशिवाय पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत अटक केलेल्या दोन्ही आरोपींनी गोळीबार केल्याचं मान्य केलं आहे. या दोघांनी ‘कथित गुन्ह्यात सक्रिय भूमिका बजावली’ असं प्राथमिक तपासात समोर आलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचा : Salman Khan House Firing : गोळीबार केल्यानंतर पोलिसांच्या ससेमिऱ्यापासून वाचण्याकरता आरोपींनी केस कापले, दाढी केली अन्…

“आरोपींनी सलमान खान व्यतिरिक्त इतर कोणावरही हल्ला करण्याचा कट आखला होता का? याचा तपास आरोपींच्या पुढील चौकशीत करण्यात येईल. तसेच गुन्ह्यात वापरलेली बंदुक अद्याप जप्त केलेली नाही. याशिवाय दुचाकीबाबत सुद्धा तपास करणं आवश्यक आहे. या घटनेनंतर एका व्यक्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणजेच फेसबुकवर पोस्ट शेअर करत याची जबाबदारी स्वीकारली. प्राथमिक तपासानुसार हे खातं परदेशातून चालवलं जात आहे.” असं पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं.

हेही वाचा : “या भ्याड हल्ल्याचा…”, शत्रुघ्न सिन्हांची सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराबद्दल प्रतिक्रिया; म्हणाले, “मला या…”

फेसबुक पोस्टचा आयपी (इंटरनेट प्रोटोकॉल ) अ‍ॅड्रेस हा पोर्तुगालचा असून गुन्हे शाखेचे पोलीस याची सत्यता पडताळून पाहत आहे अशी माहिती सोमवारी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली होती. आरोपींवर भारतीय दंड संहिता कलम ३०७ (हत्येचा प्रयत्न), १२०-बी (गुन्हेगारी कट) , ३४ आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय सलमानच्या घरावर गोळीबार करून पुढे त्याच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या माउंट मेरी चर्चजवळ दुचाकी टाकून देण्यात आली होती असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan galaxy apartment firing case gunmen fire in bid to kill actor police tell court sva 00