बॉलिवूडचा दबंग सलमान खान हा सध्या त्याच्या ‘टायगर ३’या चित्रपटावर काम करत आहे. मनीष शर्मा या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. सलमानचा नुकताच आलेला ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावी तशी कमाल दाखवू न शकल्याने सगळ्यांच्या नजरा आगामी ‘टायगर ३’वर खिळल्या आहेत. याच ‘टायगर ३’च्या सेटवर घडलेल्या एका धक्कादायक गोष्टीचा खुद्द सलमानने खुलासा केला आहे.
‘टायगर ३’च्या सेटवर सलमान खानला गंभीर दुखापत झाल्याची बातमी समोर आली आहे. सलमान खानने आपल्या सोशल मीडियावर पाठमोरा फोटो टाकत चाहत्यांनी याबद्दल माहिती दिली आहे. या फोटोत सलमान पाठमोरा उभा आहे आणि त्याच्या पाठीवर पट्टी बांधलेली दिसत आहे. नेमकी ही दुखापत कशामुळे झाली आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. सलमानचे ट्वीट पाहता त्याच्या खांद्याला दुखापत झाल्याचे स्पष्ट होत आहे.
आणखी वाचा : ‘पुष्पा २’मधील भंवर सिंह आलाय बदला घ्यायला; सेटवरील अभिनेता फहाद फाजीलचा फोटो व्हायरल
हा फोटो शेअर करताना सलमानने लिहिलं की, “जेव्हा तुम्हाला असं वाटतं की साऱ्या जगाचं ओझं तुमच्याच खांद्यावर आहे, तेव्हा तो म्हणतो जग वगैरे बाजूला ठेव, पाच किलोचे डंबेल उचलून दाखव आधी….टायगर जखमी आहे.” सलमानच्या या ट्वीटवर बऱ्याच लोकांनी कॉमेंट केली आहे.
लाडक्या भाईजानच्या तब्येतीत लवकर सुधारणा होवो यासाठी त्याच्या चाहत्यांनी प्रार्थना केली आहे. एकाने कॉमेंट करत लिहिलं आहे, “यार चित्रपट गेला खड्ड्यात, आधी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे.” ‘टायगर ३’ यावर्षी दिवाळीच्या आसपास प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटातही शाहरुख खान छोट्या कॅमिओमध्ये दिसणार आहे. ‘टायगर ३’ नंतर सलमान त्याचा भाऊ सोहेल खानच्या चित्रपटावर काम सुरू करणार आहे.