सध्या सर्वत्र दाक्षिणात्य चित्रपटांची चर्चा आहे. ‘बाहुबली’, ‘केजीएफ’, ‘पुष्पा’ यांच्यानंतर ‘आरआरआर’, ‘विक्रम’, ‘पोन्नियिन सेल्वन’ असे दाक्षिणात्य चित्रपट बॉलिवूडच्या चित्रपटांपेक्षा वरचढ ठरले आहेत. आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर मेगास्टार चिरंजीवी यांचा ‘गॉडफादर’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मोहन राजा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनीच चित्रपटाचे पटकथालेखनदेखील केले आहे. हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लूसिफर’ या मल्याळम चित्रपटाचा रिमेक आहे.
सलमान खानने या चित्रपटामध्ये एक छोटीशी भूमिका केली आहे. याबद्दल चिरंजीवी यांनी त्याचे आभार मानले आहेत. या चित्रपटासाठी सलमानने मानधन घेण्यास नकार दिला होता. फिल्म कंपॅनिअनला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, “दिग्दर्शक मोहन राजा यांना चित्रपटातील ‘त्या’ विशिष्ट भूमिकेसाठी बॉलिवूडमधील अभिनेता हवा होता. त्यांनी स्वत:हून सलमानचे नाव सुचवले. सलमान आमच्या कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे आहे. त्यांच्याशी याविषयी बोलायचे असे मी ठरवले”
सलमानशी झालेल्या संभाषणाबद्दलची माहिती देत ते म्हणाले, “मी सलमानशी या भूमिकेबद्दल बोललो. ‘त्याला ही भूमिका लहान आहे. पण कथानकासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हवं तर तू लूसिफर पाहू शकतोस’ असे सांगितले. त्यावर तो ‘ही भूमिका मी करतोय चिरु गारु (सर)’ असे म्हणाला. पुढे त्याने ‘तुमचा माणूस इथे पाठवा. आम्ही तारखा आणि बाकी गोष्टी ठरवू’ असे म्हणत चित्रपटाची स्क्रिप्ट न वाचता काम करायला होकार दिला. जेव्हा चित्रपटाचे निर्माते सलमानला जाऊन भेटले, तेव्हा ते त्यांच्याशी मानधनाबाबत चर्चा करु लागले. निर्मात्यांनी त्याला ठराविक रक्कम देऊ केली. त्यावर सलमान त्यांना ‘इथून चालते व्हा. राम आणि चिरंजीवी यांच्याविषयी माझ्या मनात असलेले प्रेम तुम्ही पैसे देऊन विकत घेऊ शकत नाही’ असे म्हणाला.
आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते’ मालिकेचे ८०० भाग पूर्ण, लेखिकेने शेअर केली खास पोस्ट
‘गॉडफादर’मध्ये चिरंजीवी व्यतिरिक्त नयनतारा, मुरली शर्मा, सुनील, सत्यदेव कांचराना या कलाकारांनी काम केले आहे. चिरंजीवी यांचा मुलगा अभिनेता रामचरणने आर.बी. चौधरी आणि एन.व्ही. प्रसाद यांच्यासह या चित्रपटाची निर्मिती केली आहे.