सलमान खानच्या घरावर रविवारी (१४ एप्रिलला) पहाटे दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. मुंबईतील वांद्रेमध्ये गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान खानच्या फ्लॅटवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केला. याप्रकरणी पोलिसांनी लगेच तपास सुरू केला आणि दोन आरोपींना गुजरातमधील भुज येथून अटक केली. सागर पाल व विक्की गुप्ता अशी आरोपींची नावं आहेत. घडलेल्या घटनेवर सागरचे वडील जोगिंदर शाह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘एनडीटीव्ही’ च्या वृत्तानुसार, सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत आपल्या मुलाचा सहभाग आहे, याची माहिती मिळाल्यावर धक्का बसला आहे, असं अटक करण्यात आलेल्या सागर पालचे वडील जोगिंदर शाह यांनी सांगितलं. सागर व विक्की दोघेही बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडण्यासाठी आरोपींना ‘इतक्या’ लाखांची दिलेली सुपारी; पोलिसांची माहिती
“सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचा या घटनेत सहभाग असल्याचं कळाल्यावर मला धक्का बसला आहे. हे कसं घडलं ते आम्हाला माहित नाही. यापूर्वी तो कोणत्याही गुन्ह्यात सहभागी नव्हता. तो खूप साधा मुलगा आहे, तो जालंधरमध्ये (पंजाब) काम करत होता, तो मुंबईत कसा पोहोचला हे मला माहित नाही,” असं सागरच्या वडिलांनी सांगितलं. ते रोजंदारीवर काम करतात.
सलमान खानचं गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घर कसं दिसतं? पाहा Inside Photos
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानच्या घरावर पाच राऊंड गोळीबार केल्यानंतर सागर व विक्की पळून थेट गुजरातला गेले होते. सोमवारी रात्री भुजमधील एका गावातून त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, आरोपीच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पश्चिम चंपारणचे पोलीस अधीक्षक डी अमरेश यांनी दिली.