Sikandar Advance Booking Day 1: सलमान खानचा ‘सिकंदर’ चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अवघे चार दिवस बाकी आहेत. ३० मार्चला ‘सिकंदर’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा पॉलिटिकल अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. मंगळवार, २५ मार्चपासून ‘सिकंदर’ चित्रपटाच्याअ‍ॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. यावरूनच सलमान खानचा २०२५ मधला पहिला चित्रपट पहिल्या दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई करणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्याच दिवशी ‘सिकंदर’ने किती कमाई केली? जाणून घ्या…

२३ मार्चला ‘सिकंदर’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला, तेव्हापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गेल्यावर्षी सलमान खानचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नव्हता. ‘सिंघम अगेन’ आणि ‘बेबी जॉन’ या चित्रपटांमध्ये फक्त त्याचा कॅमिओ पाहायला मिळाला होता, त्यामुळे ‘सिकंदर’ चित्रपटाचं प्रदर्शन भाईजानच्या चाहत्यांसाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही, म्हणूनच अ‍ॅडव्हान्स बुकिंगला लोकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. ‘सिकंदर’ चित्रपटाने अवघ्या काही तासांतच अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच ‘सिकंदर’ चित्रपटाच्या २डीमध्ये ६७ हजार १८२ तिकिटांची विक्री झाली आहे. आयमॅक्स २डीमध्ये ४५ हजार ९४ तिकिटं विकली गेली आहेत. संपूर्ण देशभरात काही तासांतच ६७ हजार २७६ तिकिटांची विक्री झाली आहे, त्यामुळे प्रदर्शनाआधीच ‘सिकंदर’ चित्रपटाने आतापर्यंत ६.११ कोटींची कमाई केली आहे.

दरम्यान, ‘सिकंदर’च्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला सलमान खानने चित्रपटाच्या कमाईबाबत भविष्यवाणी केली होती. सलमान खान म्हणाला होता की, चित्रपट चांगला असो वा वाईट, चाहते १०० कोटी पार करून टाकतात. पण, १०० कोटी ही खूप आधीची गोष्ट आहे, आता २०० कोटींचा व्यवसाय करून देतात. तसंच ट्रेलर लॉन्च सोहळ्यात ‘सिकंदर’चे दिग्दर्शक ए. आर. मुरुगादॉस यांनी स्पष्ट केलं होतं की, हा चित्रपट रिमेक नाही. ते म्हणाले होते, “चित्रपटाची कथा नवीन आणि ओरिजिनल आहे. प्रत्येक सीन आणि फ्रेम विचारपूर्वक केली आहे, जेणेकरून प्रेक्षकांना नवीन अनुभव मिळेल.” ‘सिकंदर’ चित्रपटात पहिल्यांदाच सलमान खानसह दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना पाहायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त चित्रपटात काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर झळकणार आहे. तसंच ‘बाहुबली‘ चित्रपटातील कटप्पा म्हणजे अभिनेता सत्यराज खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.