अभिनेता सलमान खानची भाची अलिझेह अग्निहोत्रीने ‘फर्रे’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. सलमान खानने निर्मिती केलेला ‘फर्रे’ चित्रपट शुक्रवारी २४ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. पण पहिल्या दिवसाची आकडेवारी पाहता चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. हा चित्रपट शाळकरी मुलांवर आधारित आहे. सलमान खानच्या भाचीसह इतर कलाकारांनी याचं जोरदार प्रमोशनही केलं होतं.
‘सॅकनिल्क’च्या अहवालानुसार, ‘फर्रे’ने पहिल्या दिवशी ५० लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. पण ही प्राथमिक आकडेवारी आहे. हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ होऊ शकते. हा चित्रपट थायलंडमधील ‘बॅड जिनियस’ चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. अलिझेह अग्निहोत्रीचा हा चित्रपट परीक्षेतील हायटेक चिटिंगवर आधारित आहे.
चित्रपटाला समीक्षकांकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत, पण प्रेक्षकांची संख्या मात्र कमी आहे. चित्रपटाला ९.६ आयएमडीबी रेटिंग मिळाले आहे. याचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सौमेंद्र पाधी यांनी केले आहे. यामध्ये अलिझेह व्यतिरिक्त, झेन शॉ, साहिल मेहता, प्रसन्ना बिश्त, रोनित बोस रॉय आणि जुही बब्बर सोनी प्रमुख भूमिकेत आहेत.
“मी मागच्या २५ ते २६ वर्षांपासून रात्री…”, सलमान खानचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा
दरम्यान, सलमान खानबद्दल बोलायचं झाल्यास त्याचा ‘टायगर ३’ चित्रपट १२ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने चांगली कामगिरी केली आहे. भारतात चित्रपटाने २५० कोटींचा व्यवसाय केला आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा ४०० कोटींहून अधिक आहे. सलमान सध्या या चित्रपटाचं यश साजरं करत आहे. या चित्रपटात कतरिना कैफ व इमरान हाश्मी यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.