रसलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर रविवारी (१४ एप्रिल) पहाटे गोळीबार झाला. या घटनेनंतर त्याच्या घराबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. याचदरम्यान मोठी माहिती समोर आली आहे. सलमानने त्याच्या टीमला सांगितलंय की तो त्याची सगळी कामं आधी ठरलीये त्याचप्रमाणे करेल. कोणताही प्लॅन रद्द करायचा नाही आणि गोळीबाराच्या घटनेकडे फारसे लक्ष द्यायचे नाही, असंही त्याने टीमला म्हटलंय, असं वृत्त ‘इंडिया टुडे’ ने वृत्त दिलंय.
सलमानने ईदच्या दिवशी ‘सिकंदर’ नावाच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली, पण सध्या तो कोणत्याही चित्रपटासाठी शूटिंग करत नाहीये. येत्या काही दिवसांत तो जाहिरातींसाठी शूटिंग करणार नाही. तो त्याची ठरलेली कामं त्याच वेळापत्रकाप्रमाणे करणार आणि त्यात कोणताही बदल करणार नाही, असं सूत्रांनी म्हटलं आहे.
सलमान खानचं गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घर कसं दिसतं? पाहा Inside Photos
“सलमान आधीच ठरल्याप्रमाणे त्याच्या कामावर लक्ष केंद्रित करणार आहे. त्याने टीमला कोणतेही नियोजित प्लॅन रद्द न करण्यास सांगितलं आहे. तो या गोळीबाराच्या घटनेमागे असलेल्या लोकांकडे फार लक्ष देत नाही. कारण ते त्याचं लक्ष वेधण्यासाठी या गोष्टी करत आहे, असं अभिनेत्याला वाटतंय. त्याने इंडस्ट्रीतील मित्रांना आणि कलाकारांना काळजी करू नका असं सांगितलं आहे. तसेच आता कोणीही गॅलेक्सी अपार्टमेंटला भेट देऊ नये, कारण त्यामुळे सोसायटीच्या इतर लोकांना अडचणी येत आहेत, असंही त्याने म्हटलंय,” असं ‘इंडिया टुडे’ला सूत्रांनी सांगितलं.
दरम्यान, ही गोळीबाराची घटना घडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसह बाबा सिद्दीकी व झिशान सिद्दीकी यांनी सलमानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. तसेच त्याचे भाऊ अरबाज खान, सोहेल खान, त्याची बहीण अर्पिता खान, तिचा पती आयुष शर्मा, अरबाजचा मुलगा अरहान त्याच्या घरी गेले होते.