Salman Khan on Baba Siddique: राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची दसऱ्याच्या दिवशी गोळ्या घालून हत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली. राजकारण आणि कला क्षेत्रात वावर असणाऱ्या बाबा सिद्दीकींचा अशाप्रकारे खून झाल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. तीन टर्म आमदार राहिलेल्या बाबा सिद्दिकींचे सर्वपक्षीय पुढाऱ्यांशी संबंध होते. तसेच बॉलिवूडमध्येही त्यांची अनेकांशी मैत्री होती. सलमान खानशी त्यांची खास जवळीक होती. २०१४ रोजी सलमान खाननं गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासमोर बाबा सिद्दीकींचं नाव घेतलं होतं. मी त्यांनाच मतदान करतो, असे सलमान खाननं सांगितलं होतं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाबा सिद्दीकी हे शनिवारी (दि. १२ ऑक्टोबर) सायंकाळी आपला मुलगा, आमदार झिशान सिद्दीकीच्या कार्यालयात जाण्यासाठी निघाले होते. यावेळी ६६ वर्षीय सिद्दीकी यांच्यावर रात्री ९.३० वाजता गोळीबार झाला. ९.९ एमएम पिस्तूलमधून सिद्दीकी यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. ज्यामुळे गोळी लागताच सिद्दीकी जमिनीवर कोसळले.

हे वाचा >> बाबा सिद्दीकी यांनी मिटवला होता सलमान खान व शाहरुख खान यांच्यातील अनेक वर्षांचा वाद, नेमकं काय घडलं होतं?

सलमान खाननं मोदींच्या समोर घेतलं होतं नाव

२०१४ साली गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचं नाव पंतप्रधानपदासाठी चर्चेत होतं. जानेवारी २०१४ मध्ये मकर संक्रांतीनिमित्त गुजरातमध्ये आयोजित केलेल्या पतंग महोत्सवाला मोदींनी सलमान खानला आमंत्रित केलं. यावेळी राजकारणावर बोलत असताना सलमान खाननं वांद्रे पश्चिमचे तत्कालीन आमदार बाबा सिद्दीकी आणि खासदार प्रिया दत्त यांची नावं घेतली होती.

सलमान खान म्हणाला, “जो देशासाठी उत्तम माणूस आहे, तो नक्कीच निवडून येईल. लोकांनी त्यांचे काम करणारा माणूस निवडून द्यावा. जसे की, मी माझ्या विधानसभेत बाबा सिद्दीकींना मतदान करतो. तर लोकसभेला प्रिया दत्त यांना मतदान करतो. जर लोकांना वाटतं मोदी साहेब त्यांच्यासाठी सर्वात योग्य आहेत, तर लोकांनी तसा निर्णय घ्यावा. तुमच्या मतदारसंघासाठी योग्य असलेल्या उमेदवाराला मत द्या.”

हे वाचा >> Video : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर बॉलीवूडवर शोककळा! शिल्पा शेट्टी भावुक; संजय दत्तसह अनेक सेलिब्रिटी रुग्णालयात पोहोचले

सलमान खाननं मोदींसमोरच सिद्दीकी आणि प्रिया दत्त यांची नावं घेतल्यामुळं या पतंग महोत्सवाची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. सलमान खानचा दौरा नरेंद्र मोदी यांच्या प्रसिद्धीसाठी असल्याचा एक आरोप होत होता. त्यालाही सलमान खाननं मोठ्या हुशारीने परतवून लावलं होतं. कारण सिद्दीकी आणि प्रिया दत्त हे काँग्रेसचे नेते होते.

लिलावती रुग्णालयात रात्री ३ वाजता पोहोचला सलमान

बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची बातमी समजताच सलमान खान शनिवारी रात्री ३ वाजता लिलावती रुग्णालयात दाखल झाला होता. बिग बॉस हिंदीचे शुटिंग अर्धवट सोडून तो लिलावती रुग्णालयात आल्याचे सांगितले गेले.

आणखी वाचा >> Who killed Baba Siddique: बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे ‘या’ गँगचा हात; आरोपींनी दिली धक्कादायक माहिती

कोण होते बाबा बाबा सिद्दीकी?

बाबा सिद्दीकी हे १९९९, २००४ आणि २००९ मध्ये असे सलग तीन वेळा काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेवर निवडून आले होते. त्यांना २००४ ते २००८ या कालावधीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली गेली. मुंबईचे प्रश्न विशेषतः झोपडपट्ट्यांचे, चाळींचे, नागरी सुविधांचे प्रश्न ते विधानसभेत हिरिरीने मांडत असत. २०१४ च्या मोदी लाटेत त्यांचा पराभव झाला होता. २०१९ मध्ये त्यांनी निवडणूक लढविली नाही, परंतु आपल्या मुलाला झिशान सिद्दीकी याला वांद्रे पूर्वमधून निवडून आणले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. बाबा सिद्दीकी हे त्यांच्या इफ्तार पार्टीसाठी ओळखले जात असत. त्या पार्ट्यांमध्ये शाहरुख खान, सलमान खान, संजय दत्त यांच्यासारखे बॉलिवूड स्टार्स जात असत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan praises and referred baba siddique in front of narendra modi in gujrat softnews kvg
Show comments