Sikandar Naache: सलमान खानच्या बहुचर्चित व बहुप्रतीक्षित ‘सिकंदर’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या वर्षी ‘सिकंदर’ चित्रपटाची घोषणा झाली. तेव्हापासून सलमान खानच्या या चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे दोन टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सध्या ‘सिकंदर’मधील गाण्यांचा धुमाकूळ सुरू आहे. नुकतंच या चित्रपटातील नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात पुन्हा एकदा सलमान खान व रश्मिका मंदानाची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. एवढंच नाहीतर ५९ वर्षीय सलमानने जबरदस्त डान्स केला आहे.
सलमान खान व रश्मिका मंदानाच्या ‘सिकंदर’ चित्रपटातील नवीन गाणं काही तासांपूर्वी प्रदर्शित झालं आहे. ‘सिकंदर नाचे’ असं गाण्याचं नाव आहे. या गाण्यामध्ये सलमान खान जबदरस्त डान्स करताना पाहायला मिळत आहे. तसंच सलमानच्या सोबतीला रश्मिकानेदेखील धमाकेदार डान्स केला आहे. सलमान व रश्मिकाने ‘सिकंदर नाचे’ गाण्यात टर्कीच्या डान्सर्ससह डान्स केला आहे.
‘सिकंदर नाचे’ गाण्याच्या नृत्यदिग्दर्शन धुरा अहमद खानने सांभाळली होती. तसंच हे गाणं अमित मिश्रा आणि अकासा सिंहने गायलं आहे. तर ‘सिकंदर नाचे’ गाणं समीन अनजानने शब्दबद्ध केलं असून सिद्धांत मिश्राने संगीतबद्ध केलं आहे. सलमान व रश्मिकाच्या या गाण्याला क्षणार्धात प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी होळीचं औचित्य साधून ‘सिकंदर’ चित्रपटातील दुसरं ‘बम बम भोले’ गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्यालादेखील भाईजानच्या चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता.
दरम्यान, ‘सिकंदर’ चित्रपटाच्या दिग्दर्शन ए.आर.मुरुगदॉस यांनी केलं आहे. ईदच्या मुहूर्तावरच २०२५मध्ये सलमानच्या हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खान, रश्मिका मंदाना व्यतिरिक्त काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर झळकणार आहे. तसंच ‘बाहुबली ‘चित्रपटातील कटप्पा म्हणजे अभिनेता सत्यराज खलनायिकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
काही महिन्यांपूर्वी सलमान खान ‘सिकंदर’ चित्रपटाचं चित्रीकरण हैदराबादमध्ये करताना दिसला होता. हैदराबादच्या ताज फलकनुमा पॅलेस या ऐतिहासिक ठिकाणी सलमान पाहायला मिळाला होता. हैदराबादमधील हे ऐतिहासिक ठिकाण सलमान खानसाठी खूप खास आहे. कारण त्याची बहीण अर्पिताचं लग्न ताज फलकनुमा पॅलेसमध्ये झालं होतं. इथेच तिने आयुष शर्माशी लग्नगाठ बांधली होती.