Sikandar Trailer Launch Event Cancel : सलमान खान व रश्मिका मंदाना यांच्या ‘सिकंदर’ चित्रपटाची सध्या प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अवघ्या काही दिवसांत हा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘सिकंदर’ चित्रपटाची नुकतीच प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. ईदचं औचित्य साधून ३० मार्चला भाईजानचा यंदाच्या वर्षातला पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आतापर्यंत ‘सिकंदर’ चित्रपटाचे दोन टीझर, गाणी प्रदर्शित झाली आहेत. त्यामुळे प्रेक्षक ट्रेलरची वाट पाहत आहेत. अशातच ‘सिकंदर’ चित्रपटाचा ग्रँड ट्रेलर लॉन्च सोहळा रद्द केल्याचं समोर आलं आहे.
२०२४मध्ये सलमान खानचा कोणताही चित्रपट आला नव्हता. त्यामुळे सध्या त्याच्या ‘सिकंदर’ चित्रपटाची चहूबाजूने चर्चा होतं आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याचा ग्रँड सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये ३० हजार भाईजाने चाहते सहभागी होणार होते. ‘सिकंदर’च्या संपूर्ण टीमसह हा सोहळा पार पडणार होता. पण, आता सलमान खानमुळेच ‘सिकंदर’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा रद्द करण्यात आला आहे.
सलमान खानच्या सुरक्षेची काळजी घेऊन ‘सिकंदर’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा रद्द केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सलमानला येणारे धमक्यांचे फोन आणि काही घटनांचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. एप्रिल २०२४मध्ये सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर त्याला धमकीचे फोन आले होते. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव ‘सिकंदर’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा रद्द केला आहे.
माहितीनुसार, ‘सिकंदर’ चित्रपटाचा ट्रेलर २२, २३ किंवा २४ मार्चला प्रदर्शित केला जाऊ शकतो. ज्याप्रमाणे युट्यूबवर चित्रपटाचे टीझर, गाणी प्रदर्शित झाली त्याप्रमाणे ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर प्रदर्शनाची घोषणा निर्मात्यांकडून एक दिवस आधी केली जाणार आहे. ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर भारतात चित्रपटाच्या अॅडवान्स बुकिंगला सुरुवात होणार आहे. परदेशात ‘सिकंदर’ चित्रपटाची अॅडवान्स बुकिंग २४ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे.
दरम्यान, ‘सिकंदर’ चित्रपटाच्या दिग्दर्शन ए.आर.मुरुगदॉस यांनी केलं आहे. या चित्रपटात सलमान खान, रश्मिका मंदाना व्यतिरिक्त काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर झळकणार आहे. तसंच ‘बाहुबली ‘चित्रपटातील कटप्पा म्हणजे अभिनेता सत्यराज खलनायिकाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.