सलमान खान सध्या ‘सिकंदर’ चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. अवघे काही दिवस हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी बाकी आहेत. पण, धमाकेदार ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘सिकंदर’ चित्रपटात सलमान खान दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदानाबरोबर पाहायला मिळणार आहे. सलमान व रश्मिका यांच्या वयात मोठं अंतर आहे. ३१ वर्षांनी लहान असलेल्या रश्मिका मंदानाबरोबर सलमान खान झळकणार आहे. यावरूनच सोशल मीडियावर अनेकांनी ट्रोल केलं होतं. ज्याला आता सलमान खानने परखड उत्तर दिलं आहे.
२३ मार्चला रविवारी, सलमान खानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी चित्रपटातील सर्व कलाकारांनी खास हजेरी लावली होती. याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. याच ट्रेलर लॉन्च सोहळ्यात सलमान खानने वयाच्या अंतराबद्दल भाष्य केलं.
सलमानला रश्मिका मंदाना आणि त्याच्या वयामधील अंतराविषयी प्रश्न विचारला होता तेव्हा भाईजान स्पष्टच बोलला. तो म्हणाला, “जर हिरोइनला काही समस्या नाहीये. हिरोइनच्या वडिलांना काही समस्या नाहीये तर तुम्हाला एवढी समस्या का आहे? उद्या जेव्हा हिच लग्न होईल. मग मुलं होतील. तेव्हा त्या मुलांबरोबरही काम करेन. आईची तर परवानगी मिळेलच?” यावेळी रश्मिकाने मान डुलवतं होकार दिला.
एवढंच नाहीतर सलमान खानने रश्मिकाच्या कामाचं कौतुक केलं. सलमान म्हणाला की, या अभिनेत्रीने बरं नसतानाही चित्रीकरण केलं होतं. रश्मिकाने तिचं उत्कृष्ट काम दिलं आहे. तेव्हा ती ‘पुष्पा २’ चित्रपटाचंदेखील चित्रीकरण करत होती आणि संध्याकाळी तिचं चित्रीकरण पूर्ण व्हायचं. नंतर ती रात्री ९ वाजता ‘सिकंदर’च्या चित्रीकरणासाठी येत होती. सकाळी ६.३० वाजेपर्यंत रश्मिकाने माझ्याबरोबर काम केलं आहे आणि मग ती ‘पुष्पा २’च्या सेटवर परतायची. त्यावेळेस तिची तब्येतही ठीक नव्हती. तिच्या पायाला दुखापत झाली होती. एवढा त्रास असूनही तिने कधीच चित्रीकरण रद्द केलं नाही. रश्मिकाने मला माझ्या तरुणपणातील दिवसांची आठवण करून दिली.
दरम्यान, सलमान खान व रश्मिका मंदानाचा ‘सिकंदर’ चित्रपट ३० मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खान, रश्मिका मंदाना व्यतिरिक्त काजल अग्रवाल, शर्मन जोशी, प्रतीक बब्बर झळकणार आहे.