सलमान खान सध्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. डेब्यू करणाऱ्या पलक तिवारीने काही दिवसांपूर्वी सलमान खानचा सेटवरील एक नियम सांगितला होता. सलमानच्या सेटवर काम करणाऱ्या सगळ्या मुलींनी स्वतःचे अवयव नीट झाकले जातील असे कपडे घालायची सक्ती करण्यात आल्याचे पलकने स्पष्ट केले होते. पलक तिवारीच्या या वक्तव्यानंतर चर्चांना चांगलेच उधाण आले होते. पलकच्या या वक्तव्यानंतर आता खुद्द सलमानने मौन सोडले आहे.
एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना सलमान खान म्हणाला, “मला वाटते की, महिलांचे शरीर खूप मौल्यवान असते. महिलांचे शरीर जितके झाकलेले असेल तितके योग्य आहे.” सलमान खानला जेव्हा विचारण्यात आले की, ‘प्यार किया तो डरना क्या’ चित्रपटातील ‘ओ ओ जाने जाना’ गाण्यात तो शर्टलेस दिसला होता. यावर तो म्हणाला, “त्या वेळी मी स्विमिंग ट्रंकमध्ये होतो आणि तेव्हा गोष्टी वेगळ्या होत्या आणि आजकालचे वातावरण थोडे वेगळे आहे. हे पोरांचे प्रकरण आहे. मुले ज्याप्रकारे मुलींकडे पाहतात ते आपल्या बहिणी, पत्नी आणि आईसाठी बिलकूल योग्य नाही,’ असेही सलमान म्हणाला.
हेही वाचा- जिया खान प्रकरणातून निर्दोष सुटल्यानंतर सूरज पांचोलीने सलमान खानला केला होता मेसेज, म्हणाला..
सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सलमानचा मल्टिस्टारर चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ची बॉक्स ऑफिसवरील जादू फिकी पडल्याचे दिसून येत आहे. ईदच्या दिवशी प्रदर्शित झालेला हा चित्रपट लवकरच १०० कोटींची कमाई करेल अशी अपेक्षा निर्मात्यांना होती. मात्र, प्रदर्शनाच्या १० दिवसांनंतरही चित्रपटाने आत्तापर्यंत ९५.८ कोटींचीच कमाई केली आहे. सलमानचा आगामी चित्रपट ‘टायगर ३’ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यात सलमाबरोबर कतरिना कैफचीही प्रमुख भूमिका आहे. याशिवाय तो शाहरुख खानसोबत ‘टायगर वर्सेस पठाण’मध्येही दिसणार आहे.