विकी कौशल सध्या त्याच्या आगामी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने विकी-सारा ही नवी ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, खऱ्या आयुष्यात विकी कौशलने २०२१ मध्ये बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफबरोबर लग्नगाठ बांधली परंतु विकी-कतरिनाची पहिली भेट एका अवॉर्ड शोमध्ये झाली होती. आणि पहिल्याच भेटीत विकीने कतरिनाला थेट लग्नाची मागणी घातली होती.
याच अवॉर्ड शोमध्ये सलमान खानही सहभागी झाला होता. विकीने कतरिनाला लग्नाची मागणी घातलाच सलमान खानने दिलेली प्रतिक्रिया आश्चर्यकारक होती. सलमानच्या या प्रतिक्रियेचा जूना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुरस्कार सोहळ्यात विकी सूत्रसंचालन करीत होता तेव्हा त्याने “कतरिना मी तुझा खूप मोठा चाहता आहे… सध्या सगळे जण लग्न करीत आहेत तू सुद्धा एखाद्या चांगल्या विकी कौशलचा शोध घेऊन लग्न का करीत नाहीस,” असा प्रश्न करीत अभिनेत्रीला लग्नाची मागणी घातली होती. विकीने कतरिनाला प्रपोज केल्यानंतर सलमान त्याची बहीण अर्पिताच्या खांद्यावर चक्कर येऊन पडण्याचे नाटक करताना दिसत आहे. सलमान, कतरिना आणि विकीचा हा जूना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे.
विकी कौशलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर विकी आणि सारा अली खान यांचा ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपट २ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘फोन भूत’ या चित्रपटात कतरिना शेवटची दिसली होती. कतरिना सलमान खानच्या आगामी ‘टायगर ३’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबरोबरच ती ‘मेरी ख्रिसमस’ चित्रपटात विजय सेतुपतीबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.