Salman Khan Death Threat : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून मुंबईत हत्या करण्यात आली. अज्ञात हल्लेखोरांनी वांद्रे पूर्व येथील खेरवाडी सिग्नलजवळ त्यांच्यावर गोळीबार केला. प्राणघातक हल्ल्यानंतर त्यांना कार्यकर्त्यांनी त्वरीत लीलावती रुग्णालयात दाखल केलं. मात्र, त्याआधीच त्यांनी प्राण गमावले होते. बाबा सिद्दीकी यांच्या मृत्यूनंतर सध्या सर्वत्र वातावरण तापलं आहे. त्यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे.

बाबा सिद्दीकी यांना १५ दिवस आधी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तर, काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुद्धा गोळीबार झाला होता. त्या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोई गँगने स्वाकारली होती. गेल्या अनेक वर्षांपासून बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांच्या घनिष्ठ मैत्री आहे. आता याप्रकरणी पुन्हा एकदा कथित पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊन यात सलमान खानला मदत करणाऱ्यांना हिशोब द्यावा लागेल असा इशारा देण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावरच्या या व्हायरल पोस्टनंतर पोलिसांकडून हे अकाऊंट खरे आहे की खोटे याचा तपास करण्यात येत आहे.

हेही वाचा : Baba Siddique Murder: “हे तर सत्कर्म…”, सिद्दीकींच्या हत्येनंतर बिश्नोई गँगची कथित पोस्ट व्हायरल, सलमान खानलाही दिला इशारा

सलमानच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

याच पार्श्वभूमीवर आता सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. तसेच सलमानला पुढील काही दिवस घरात थांबण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री ( १२ ऑक्टोबर ) बाबा सिद्दीकींच्या हत्येची बातमी समजताच भाईजान ‘बिग बॉस’चं शूटिंग थांबवून लीलावती रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाला होता.

हेही वाचा : Video : बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर बॉलीवूडवर शोककळा! शिल्पा शेट्टी भावुक; संजय दत्तसह अनेक सेलिब्रिटी रुग्णालयात पोहोचले

दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्यावर एकूण ३ अज्ञातांनी हल्ला केला. यातील दोघांना रात्रीच अटक करण्यात आली असून यामधील एक आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस सध्या या तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. यासाठी गुन्हे शाखेची तीन पथकं मध्यप्रदेश, हरियाणा आणि दिल्ली येथे रवाना झाली आहेत. सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतरही पोलिसांकडून अशाचप्रकारे नियोजन करून आरोपींना पकडण्यात आलं होतं.