अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला जगभरातील नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली होती. बॉलीवूडचे कलाकारदेखील आपल्या परिवारासह आनंद लुटताना दिसले. वेगवेगळ्या गाण्यांवर या कलाकारांनी ताल धरल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले. त्यामध्ये बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खान(Salman Khan) चादेखील समावेश होता. आता हा लग्नसोहळा पार पडल्यानंतर सलमान खानने सोशल मीडियावर अनंत आणि राधिकासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
काय म्हणाला सलमान खान?
इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना सलमान खानने म्हटले आहे, “अनंत आणि राधिका, मिस्टर अॅण्ड मिसेस अंबानी. तुमचं एकमेकांवर आणि एकमेकांच्या कुटुंबाप्रति असलेलं प्रेम मी बघितलं आहे. या विश्वानं तुम्हाला एकत्र आणलं आहे. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो आणि तुमचे आयुष्य आनंदाने भरलेले असो, अशा माझ्या शुभेच्छा आहेत. जेव्हा तुम्ही दोघे अद्भुत पालक व्हाल, त्यावेळी डान्स करण्यासाठी मी वाट बघू शकत नाही”, अशा आशयाची सुंदर पोस्ट भाईजानने अनंत-राधिकासाठी शेअर केली आहे. हे लिहिताना त्याने राधिका आणि अनंत अंबानीचा लग्नातील एक फोटोदेखील शेअर केला आहे.
काही दिवसांपासून या जोडप्याच्या लग्नाची चर्चा होती. त्यांच्या लग्नासाठी जगाच्या कानाकोपऱ्यांतून अनेक नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली होती. १२ जुलैला सर्वांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.
दरम्यान, या सोहळ्यातील अनेक इनसाइड व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. माधुरी दीक्षितने ‘चोली के पीछे क्या है’ गाण्यावर ताल धरलेला दिसला. दुसरीकडे, शाहरुख खानने अमिताभ बच्चन यांना पाहताच वाकून नमस्कार केल्याचे पाहायला मिळाले होते. अभिनेता रणबीर कपूरला एका व्यक्तीने बिझनेस कार्ड दिल्याचा व्हिडीओ जेव्हा समोर आला होता, तेव्हा ती व्यक्ती कार्ड देताना रणबीरला काय म्हणाली असेल, याचा अंदाज करीत नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या होत्या.
हेही वाचा: “जर तुला भारतात काम करायचे असेल तर…,” आमिर खानने लाडक्या लेकाला दिला होता ‘हा’ सल्ला
सलमान खानच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ‘सिकंदर’ चित्रपटातून तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबरोबरच, सलमान खान ‘बिग बॉस’ या कलर्स टीव्हीवरील कार्यक्रमाचे यशस्वीपणे सूत्रसंचालन करत असतो. आता अनंत-राधिकासाठी त्याने लिहिलेल्या पोस्टमुळे तो पुन्हा एकदा चर्चांचा भाग बनला आहे. या जोडप्याच्या लग्नात सलमान खान किंग खानच्या सोबतीने डान्स करताना दिसला होता.