Salman Khan vs Bishnoi Community: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या शूटर्सने हल्ला करून त्यांची हत्या केली. सलमान खानशी संबंध असल्यामुळे बाबा सिद्दिकी यांची हत्या केल्याचा दावा लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून करण्यात आला. या सर्व पार्श्वभूमीवर सलमान खान यांचे वडील सलीम खान यांनी भाष्य केले. एबीपी न्यूज वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी काळवीटची शिकार सलमान खानने केलीच नाही, असा दावा केला. जर त्याने काही गुन्हा केलेलाच नाही तर माफी कशाची मागणार. आमच्याकडून पैसे उकळण्यासाठी असे आरोप केले जात आहेत, असाही आरोप सलीम खान यांनी केला होता. यानंतर आता बिश्नोई समाजाकडून संताप व्यक्त करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अखिल भारतीय बिश्नोई महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र बिश्नोई यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सलीम खान यांच्या मुलाखतीनंतर प्रतिक्रिया दिली. त्यात ते म्हणाले, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबद्दल आम्हाला काही माहिती नाही. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. पण सलमान खानने बिश्नोई समाजाची माफी मागायला हवी. त्याने काळवीटाची शिकार केली, ते दुःख बिश्नोई समाज मागच्या २४-२५ वर्षांपासून विसरलेला नाही. लॉरेन्स बिश्नोईही यामुळेच दुःखी आहे.

हे वाचा >> Salim Khan: लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या धमक्यांवर सलमान खानचे वडील सलीम खान यांची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाले…

सलमान खानने पुन्हा दुसरा गुन्हा केला

देवेंद्र बिश्नोई पुढे म्हणाले, “सलमान खानने माफी मागून प्रायश्चित करायला हवे होते. त्याने खूप मोठी चूक केलेली आहे. नुकतेच त्याचे वडील सलीम खान यांनी सांगितले की, सलमानने शिकार केलीच नाही. मग ते काळवीट कसे मेले? मुख्य साक्षीदार, पोलीस आणि वन विभागाने का तक्रार दाखल केली? न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली, तो तुरुंगातही गेला. हे सर्व खोटे होते का? फक्त सलमान खानचे कुटुंबच खरे बोलत आहे का? काल सलीम खान यांनी बिश्नोई समाजावर खंडणीचा आरोप केला. बिश्नोई समाज हा पर्यावरण, वृक्ष आणि जंगली श्वापदांची निस्वार्थपणे सेवा करत आला आहे. आम्हाला कुणाचेही पैसे नकोत. आम्ही मेहनत, मजुरी, शेती करून पैसे कमवतो. सलमान खानने आधी शिकार करून आणि आता पैशांचा आरोप करून दुसरा गुन्हा केला आहे.”

सलमानबाबत त्याचे वडील सलीम खान काय म्हणाले? (फोटो-सलमान खान फेसबुक पेज आणि इंडियन एक्स्प्रेस)

सलमान खान प्राण्यांवर प्रेम करणारा माणूस

दरम्यान सलीम खान यांनी एपीबी न्यूजच्या मुलाखतीत सांगितले की, सलमान खान हा प्राण्यांवर प्रेम करतो. त्याच्याकडे एक श्वान होता. त्या श्वानाचा मृत्यू होईपर्यंत सलमानने त्याच्यावर प्रेम केले. श्वान मेल्यानंतर सलमान रडला. तेव्हाच मी त्याला विचारले होते, त्या काळवीटाला कुणी मारले? तो म्हणाला मी नाही मारले. मला माहितीये सलमान प्राण्यांवर प्रेम करणारा माणूस आहे. सलमान खानला ज्या धमक्या आल्यात तो फक्त खंडणी उकळण्याचा प्रकार आहे, असा आरोप सलीम खान यांनी केला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan should apologize blackbuck killing demans from bishnoi mahasabha after salim khan interview kvg