Salman Khan’s Sikandar Leaked Online : सलमान खानचा बहुप्रतीक्षित ‘सिकंदर’ चित्रपट आज ( ३० मार्च ) ईदच्या निमित्ताने सर्वत्र प्रदर्शित झाला. ‘टायगर ३’ नंतर जवळपास दीड वर्षांनी बॉलीवूडचा भाईजान या सिनेमाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. यामुळे सर्व चाहत्यांच्या मनात या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुकता होती. मात्र, ‘सिकंदर’ सिनेमा प्रदर्शित झाल्यावर पहिल्याच दिवशी निर्मात्यांना मोठा फटका बसला आहे.

सलमान खानचा सिनेमा ऑनलाइन लीक झाला आहे. थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यावर पहिल्याच ‘सिकंदर’ लीक झाल्याने या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘सिकंदर’ हा चित्रपट पहिल्याच दिवशी एचडी क्वालिटीमध्ये ऑनलाइन लीक झाला आहे. हा चित्रपट तमिळरॉकर्स, मुव्हीरुल्झ, फिल्मीझिला आणि टेलिग्राम ग्रुप सारख्या प्लॅटफॉर्मवर मोफत पाहण्यासाठी उपलब्ध आहे. या वेबसाइट्सवर चित्रपटाच्या बेकायदेशीर स्ट्रीमिंग लिंक्स व्हायरल करण्यात आल्या आहेत. यामुळे सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर देखील परिणाम होणार आहे.

सरकार बेकायदेशीर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवर सतत कारवाई करत असूनही, चित्रपट प्रदर्शनाआधी किंवा पहिल्याच दिवशी लीक होणं ही एक निर्मात्यांकरता मोठी समस्या निर्माण झाली आहे. सिकंदर कॅमकॉर्डर रेकॉर्डिंगमधून लीक झाला असावा आणि त्यानंतर काही तासांतच एचडी गुणवत्तेत अपलोड करण्यात आला दावा करण्यात येत आहे.

‘सिकंदर’चे दिग्दर्शन ए.आर. मुरुगदास यांनी केलं आहे. सलमान खानसह रश्मिका मंदान्ना, प्रतीक बब्बर आणि शर्मन जोशी यांच्यासह अनेक कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

दरम्यान, ‘टायगर ३’नंतर सलमान दीड वर्षांनी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर परतला आहे. यामुळेच सिकंदरकडून प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा होती. संपूर्ण भारतात सिंकदरचे ८ हजार शो आहेत. ईदच्या लागोपाठ सुट्ट्या असल्याने या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनकडे सर्वांचं लक्ष आहे. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी किती कमाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.