अभिनेता सलमान खानच्या आगामी ‘सिकंदर’ या सिनेमाची त्याच्या चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. चाहत्यांच्या लाडक्या भाईजानचा २०२४ मध्ये एकही सिनेमा प्रदर्शित झाला नाही. यामुळे सलमानचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाचा टीझर सलमानच्या वाढदिवशी म्हणजेच २७ डिसेंबर २०२४ ला प्रदर्शित होणार होता. पण माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे याचे प्रदर्शन पुढे गेले होते. आता सलमानचा ‘सिकंदर’ सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
‘सिकंदर’च्या टीझरच्या सुरुवातीला सलमान पाठमोरा दाखवला आहे. यात सलमान एका गूढ ठिकाणावरुन चालत चालत पुढे जाताना दाखवला आहे. दरम्यान एका काचेच्या पेटीत विविध बंदुकी दाखवल्या आहेत. सलमान जसा जसा पुढे जातो तिथे पूर्वीच्या काळी राजे आणि सैनिक युद्धावर जाताना जो पोशाख परिधान करत असत तसा पोशाख परिधान केलेले सैनिकांचे पुतळे दिसतात. सलमान पुढे गेल्यावर मात्र या गूढ ठिकाणीतील एक पुतळा हालचाल करतो.
सलमान पुढे गेल्यावर तेव्हा सर्वच पुतळ्यातून हालचाल दिसते, या पुतळ्यात लपून काही मारेकरी सलमानवर हल्ला करण्यासाठी आलेले असतात. त्यांच्या हातातले शॉटगन्स घेऊन ते हळू हळू पुढे जातात. तेव्हा सलमान पुढे जाऊन पाठमोरा थांबतो आणि एक डायलॉग म्हणतो, “सुना है की बोहोत सारे लोग मेरे पीछे पडे है…बस्स…मेरे मरने की देर है” असे म्हणून सलमान त्या पुतळयातील लपलेल्या मारेकऱ्यांचा बंदुकी पकडून जबरदस्त अॅक्शन करतो. आणि सर्व शत्रूंना मारतो. त्याचा अॅक्शन करतानाच रावडी अंदाज, आणि त्याच्या जोडीला असणारा बॅकग्राउंड म्युझिक (पार्शवसंगीत) सिनेमाची उत्कृष्ट झलक दाखवतो. या सिनेमाचा टीझर पाहून सलमानचे चाहते त्याचे कौतुक करत आहेत.
या सिनेमाचे दिग्दर्शन ‘गजनी’ फेम दिग्दर्शक ए आर मुरगूदास यांनी केले असून त्यांचा अॅक्शन सिनेमात हातखंडा आहे. त्यांनी याआधी अक्षय कुमारच्या ‘हॉलीडे’ सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. ‘सिकंदर’मध्ये सलमान खानसह रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. हा सिनेमा २०२५ मध्ये ईदला प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा…“तू सलमान खानला डेट केलं आहेस का?” चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देत प्रीती झिंटा म्हणाली, “तो माझा…”
सलमानला या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान लॉरेन्स बिश्नोई गँगकडून अनेक धमक्या आल्या. यानंतर त्याची सुरक्षा व्यवस्था वाढण्यात आली. सलमान खाननेकाल (२७ डिसेंबर २०२४) रोजी आपल्या कुटुंबियांसमवेत त्याचा वाढदिवस साजरा केला.